पुणे शहर, उपनगरे आणि धरणांच्या क्षेत्रात मंगळवारी दिवसभर आणि रात्री इतका मोठा पाऊस पडला, की पुण्यातील या हंगामातील पावसाचा उच्चांक नोंदवला गेला. पुणे वेधशाळेत चोवीस तासांत तब्बल ८४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या मोठय़ा पावसाच्या दिवसाचा संपूर्ण शहरावर परिणाम झाला. तो बुधवारी सोसावा लागला.. काही वस्त्यांमध्ये पाणी घुसले.. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्याचबरोबर अठरा ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडून नुकसानही झाले. एवढय़ावरच भागले नाही, तर पिंपरी-चिंचवड परिसरात पुणे-मुंबई रस्त्यावरील ग्रेड सेपरेटवर मध्ये पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली. या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही हाच काय तो समाधानाचा भाग!
शहरात मंगळवारी दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे नांदेड फाटा येथील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सकाळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्यात पाणी साचल्यामुळे सकाळी वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना झाला. खडकवासला धरणातून सुमारे १७ हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला होता. नदी पात्रातील रस्त्यावर पाणी आल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण जवळील सर्व रस्त्यांवर आला. त्यामुळे कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, फग्युर्सन रस्ता, मनपा समोरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्या बरोबरच नदीपात्रात अचानक पाणी वाढल्यामुळे काहींची पार्किंग केलेली वाहने त्यामध्ये अडकलेली होती. ती सकाळी बाहेर काढण्यात आली. पुणे-मुंबई रस्त्यावर पिंपरी येथील मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये पाणी साचल्यामुळे तो रस्ता सकाळी काही वेळ वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड फाटा येथे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याबरोबरच चंदननगर येथील सैनिकनगर येथे रात्री पाणी घुसले होते. साधारण अडीच ते तीन फूट पर्यंत या ठिकाणी पाणी साचले होते. तसेच धानोरी पोलीस चौकीजवळच्या इंद्रप्रस्थ बिल्डिंगमध्ये पहाटे पाणी शिरले होते. सिंहगड रस्त्यावरील चैतन्य हॉस्पिटलजवळ नाल्याची भिंत पडल्याचा प्रकार घडला. मात्र, सुदैवाने कोठेही जीवितहानी झालेली नाही.
लोणावळ्यात दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायटय़ात पाणी घुसले आहे. गेल्या चोवीस तासांत लोणावळ्यात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सोसायटय़ांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
एक जण वाहून गेला
गरवारे पुलावरून एका व्यक्तीने मुठा नदीत उडी मारल्याचा दूरध्वनी अग्निशामक नियंत्रण कक्षाला दुपारी आला. त्याला नदी पात्रातील सभेच्या मैदानापर्यंत वाहत असताना काही नागरिकांनी पाहिले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली. मात्र, त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही.
आपत्ती निवारण कक्ष तयारीत
खडकवासला धरणातून ४० हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगाने वा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यास नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातर्फे पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना इशारा केव्हा द्यायचा, त्यांना घरांमधून हलवावे लागल्यास त्यांना कोणत्या शाळांमध्ये तात्पुरता निवारा द्यायचा, त्यांना कोणत्या वाहनांमधून हलवायचे, निवारा तसेच भोजन व अन्य व्यवस्था कशा पद्धतीने करायच्या याची सिद्धता करण्यात आली असून महापालिकेत त्यासाठी पूरनियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे.
बाधित होणारे भागही निश्चित
मुठा नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील १०, उजव्या किनाऱ्यावरील २६ आणि इतर तीन अशा ३९ वस्त्यांना पुराच्या पाण्यापासून धोका असून या सर्व वस्त्यांसाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू होताच हे अधिकारी त्यांचे काम सुरू करतील. या वस्त्यांमधील नागरिकांसाठीची मदतकेंद्रही निश्चित असून मुख्यत: महापालिका शाळांच्या इमारती त्यासाठी वापरल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा