देशात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. हा अंदाज पहिल्या टप्प्यातील असून, सुधारित अंदाज जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. दक्षिण आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी बुधवारी, भारतात कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्या पाठोपाठ देशाच्या हवामान विभागानेही असाच अंदाज जाहीर केल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हवामान विभागाने पाच घटकांच्या आधारावर हा अंदाज दिला आहे. तो देताना देशातील आणि जगभरातील प्रमुख हवामान संस्थांनी दिलेल्या अंदाजांचीही दखल घेतली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १९५१ ते २००० या वर्षांच्या आकडेवारीनुसार देशात पावसाळ्यात काळात (जून ते सप्टेंबर) सरासरी ८९० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात ९५ टक्के पाऊस यंदा अपेक्षित आहे. मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम करणारा ‘एल-निनो’ हा घटक सक्रिय होण्याची या वर्षी ६० टक्के शक्यता आहे. त्याचा पावसावर परिणाम अपेक्षित आहे.
पुढच्या टप्प्यातील अंदाज जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे. तो अधिक जवळ जाणारा असेल. शिवाय देशाच्या चार उपविभागांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल, याचाही त्यात उल्लेख असेल.
याचबरोबर देशात अपुरा पाऊस, सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता किती प्रमाणात आहे, हेही या वेळी जाहीर केले आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे-
(पावसाचा प्रकार)            (म्हणजे किती पाऊस)                (यंदा त्याची शक्यता)
अपुरा पाऊस                सरासरीच्या ९० टक्क्य़ांपेक्षा कमी            २३ टक्के
सरासरीपेक्षा कमी           सरासरीच्या ९० ते ९६ टक्के                 ३३ टक्के
सरासरीइतका                सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के                 ३५ टक्के
सरासरीपेक्षा जास्त          सरासराच्या १०४ ते ११० टक्के            ०८ टक्के
अतिवृष्टी                       सरासरीच्या ११० टक्क्य़ांपेक्षा जास्त        ०१ टक्का
हा अंदाज देण्यासाठी हवामानाचे पाच घटक वापरण्यात आले आहेत. ते असे –
१. उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागरांच्या पृष्ठभागाच्या तापमानातील तफावत
२. विषुवृत्तीय दक्षिण हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान
३. पूर्व आशियावरील समुद्रसपाटीजवळचा हवेचा दाब
४. वायव्य (उत्तर-पश्चिम) युरोपच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान
५. विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील उबदार पाण्याचे प्रमाण