पुण्यात ढगाळ वातावरण कायम असूनही गेले काही दिवस हुलकावणी देत असलेल्या पावसाने शुक्रवारी अखेर हजेरी लावली. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड, उपनगरे आणि जिल्ह्य़ातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. पुणे वेधशाळेत या पावसाची नोंद ३ मिलिमीटर इतकी झाली.
पुण्याच्या परिसरात गेले आठवडाभर ढगाळ वातावरण कायम आहे. दुपारनंतर आकाशात दाटून येणाऱ्या ढगांमुळे पाऊस पडेल अशीच अपेक्षा असायची. मात्र, काही भागांतील किरकोळ सरी वगळता पाऊस पडतच नव्हता. पावसाने शुक्रवारी ही उणीव भरून काढली. शहराच्या विविध भागात दुपारी सव्वातीन-साडेतीनच्या सुमारास पावसाच्या सरी पडू झाल्या. पुणे स्टेशन, ससून रुग्णालय, नगर रस्ता, वडगाव शेरी, तसेच, पिंपरी-चिंचवड परिसर येथे जोरदार सरी कोसळल्या. याशिवाय शिरूरसह जिल्ह्य़ातही अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पाऊस पडला. पुणे वेधशाळेत सायंकाळपर्यंत ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हवामानाची हीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांतही पुण्यात ढगांच्या गडगडाटात पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे.

Story img Loader