पुण्याजवळील मुळशी, ताम्हिणी घाट, कोलाड ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे! एरवी मे अखेरीपासूनच गजबजू लागणाऱ्या या ठिकाणांना या वर्षी मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. गेला आठवडाभर झालेल्या पावसाने आता हळूहळू पर्यटकांची वर्दळ सुरू झाली असली, तरी या ठिकाणी असलेली कॉटेजेस, हॉटेल्स यांचा जून महिन्यात झालेला व्यवसाय तब्बल पन्नास टक्क्य़ांनी कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मे अखेरीपासून वळीवाचा पाऊस सुरू झाला की पावसासाठी पर्यटनाचे बेत बनू लागतात. पुण्याजवळील मुळशीचा भाग ते ताम्हिणी घाट, कोलाडचा कुंडलिका नदीचा भाग ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे. धरणाचा भाग, धबधबे, पावसाळी कीटक, पक्ष्यांची घरटी, रानफुले यामुळे पर्यटकांना या भागाचे विशेष आकर्षण आहे. पर्यटकांची हौस भागवण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी हॉटेल्स, कॉटेजेसही सुरू केली आहेत.
या वर्षी मात्र या व्यावसायिकांचा जून महिना पर्यटकांची वाट पाहण्यातच गेला. दरवर्षीपेक्षा यावर्षी जवळपास पन्नास टक्क्य़ांनी उलाढाल कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दरवर्षी एका महिन्यात एका कॉटेज किंवा हॉटेलची उलाढाल ही साधारण दीड ते दोन लाखांच्या घरात होते. मात्र, या वर्षी उलाढाल घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. एरवी जून महिन्यात प्रत्येक कॉटेजला सरासरी २०० ते २५० पर्यटक भेट देतात. मात्र, या वर्षी ही संख्या शंभरच्या जवळपास असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोदवले आहे. जवळपास संपूर्ण जून महिन्यामध्ये एकही धबधबा वाहू लागला नाही. धरणाची पातळीही खालावल्यामुळे पर्यटकांचा विरस झाला. मात्र, गेला आठवडाभर झालेल्या पावसाने व्यावसायिकांना जरा दिलासा दिला आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या पावसाने पर्यटकांची पावले आता पुन्हा मुळशीकडे वळू लागली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा