नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
उत्तरेकडून कोरडे आणि उष्ण वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे उत्तर आणि मध्य भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. जम्मू विभागापासून राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाचा दक्षिण भाग, दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, छत्तीसगडसह विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भात गेल्या सलग दोन दिवसांपासून चंद्रपूरमध्ये ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे आणि देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.
हेही वाचा >>> राज्य सरकारचा मोठा निर्णय! संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार
पारा चांगलाच वाढल्याने विदर्भातील सर्वच भागांत लाहीलाही होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही भागात पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. अशा स्थितीत आता पावसामुळे मिळणाऱ्या थंडाव्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा
निम्म्या भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती असतानाच मोसमी पाऊस सक्रिय झालेल्या भागात आणि जवळच्या परिसरात सध्या जोरदार पाऊस होत आहे. मेघालयमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. काही विभागांत २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होत आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमालयाच्या उपविभागात पाऊस होत आहे. केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्येही पावसाने जोर धरला आहे.
हेही वाचा >>> Coronavirus : राज्यात दिवसभरात १ हजार ३५७ नवीन करोनाबाधितांची नोंद
मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ
अरबी समुद्राच्या बाजूने २९ मे रोजी केरळात आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकात प्रगती करून कारवारपर्यंत दाखल झालेल्या मोसमी पावसाचा प्रवास सध्या संथ गतीने सुरू आहे. गोव्याच्या जवळ तो पोहोचला असला, तरी पोषक वातावरण नसल्याने त्याची पुढे प्रगती थांबली आहे. अरबी समुद्रातील शाखेने गेल्या चार दिवसांपासून आगेकूच केली नाही. बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या शाखेने ३ जूनला मोठी प्रगती करीत पूर्वोत्तर राज्यांसह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रगती केली. मात्र, शनिवारी (४ जून) याही भागातून मोसमी पावसाची प्रगती थांबली होती.