पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पिंपरी चिंचवडच्या रावेत भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर वादळी वाऱ्यामुळे पार्किंग मध्ये उभा केलेल्या दुचाकी देखील खाली पडल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान या रावेत भागात होर्डिंग कोसळून ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकीचालक भिजल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा…. अजित पवारांनी कोणताही निर्णय घ्यावा, मी त्यांच्या पाठीशी उभा असेन; आमदार अण्णा बनसोडे
रावेत भागातील मुकाई चौकात वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या पाठीमागे झाडपडीची घटना घडली असून दुचाकी देखील वादळी वाऱ्यामुळे पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फ्लेक्स देखील फाटले असून मुकाई चौकात वाहतूक कोंडी झाली होती. काही मिनिटं पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले होते.