पुणे : अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह इतर काही ठिकाणी रविवारपासून (११ जुलै) चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील घाट विभागांमध्ये चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे किनारपट्टीच्या भागात पावसाला पोषक वातावरण आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्तच वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे ११ जुलैला या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. परिणामी विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडय़ात पावसाचा अंदाज आहे. या क्षेत्रामुळे उत्तर-पश्चिमेकडे थांबलेल्या मोसमी पावसाचा प्रवासही सुरू होऊ शकणार आहे. अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणामुळे कोकण विभागात बहुतांश ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. काही भागांत जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात किनारपट्टीच्या भागात सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असून, तुरळक ठिकाणी घाट विभागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. तुरळक ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे.