पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या खेळामुळे राज्याच्या बहुतांश भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला असून, त्याचा विपरीत परिणाम कोकणातील आंब्यापासून ते देशावरील हरभरा, ज्वारी ही पिके तसेच, द्राक्षावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फ्लूजन्य आजारासह सध्या धुमाकूळ घालत असलेला स्वाइन फ्लूचा प्रसार होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी पावसाने हजेरी लावली. जेथे पाऊस पडला नाही त्या ठिकाणी ढगाळ वातावरण कायम होते. कोकणात सकाळपासून पाऊस सुरू होता, तर राज्याच्या इतर भागातही पावसाच्या सरी पडल्या. पुणे वेधशाळेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत कुलाबा येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय सांताक्रुझ (२ मिलिमीटर), अलिबाग (५) तसेच, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर (३), नाशिक (२), सातारा (१), विदर्भात अकोला (०.२), यवतमाळ (२) येथेही पावसाची नोंद झाली. याशिवाय पुण्यात रात्री पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तसेच, रत्नागिरी, वाई, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना अशा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण कायम होते.
पावसाचे कारण काय?
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वारे वाहात आहेत. ते एकमेकांना भिडत असल्याने पाऊस पडत आहे. महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांबरोबरच गुजरातमध्ये कच्छ-सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे.
आणखी किती दिवस पडणार?
सध्या सुरू असलेला पाऊस सोमवापर्यंत (२ मार्च) कायम राहील. तो रविवारी व सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पडेल. यापैकी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.
पिकांवर परिणाम काय?
कोकणात हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया जाण्याचा धोका आहे. काजू तयार असल्याने त्याच्यावरही रोग पडण्याची भीती आहे. तासगाव येथील कृषितज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हरभरा, ज्वारीची काढणी सुरू आहे. त्याचे नुकसान अटळ आहे. द्राक्षे पक्व होऊन त्याची तोडणी मागेच सुरू झाली आहे. मात्र, अजूनही निम्म्याहून अधिक माल बागांमध्येच आहे. त्याचा दर्जा खराब होण्याचा धोका आहेच. आताचा काळ बेदाणा वाळवण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. विशेषत: रंग, चव असा दर्जा खालावून भाव कमी मिळण्याचा धोका आहे.
स्वाईन फ्लूला पोषक वातावरण
राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक (साथरोग) डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘पावसाळ्यात तापमान कमी होत असल्यामुळे तो फ्लूसाठी पोषक असतो. स्वाईन फ्लूच्या फैलावाच्या दोन प्रमुख कालखंडांमधील एक जुलै-ऑगस्ट हाच असतो. गेल्या काही दिवसांपासून तापमान हळूहळू वाढत चालले होते. त्यात मध्येच पाऊस पडल्याने तापमान पुन्हा खाली आले. हा पाऊस टिकणारा नसला तरी पुढचे चार-पाच दिवस कमी तापमान राहू शकेल. त्यामुळे हे वातावरण स्वाईन फ्लूला पोषक ठरू शकते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा