पुणे : राज्यातील सर्वच विभागात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. दक्षिण कोकणामध्ये या काळात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात तुरळक भागात हलका ते मध्यम पाऊस, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांत पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातून सध्या काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दक्षिण कोकणामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पावसाची हजेरी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट विभागातही काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या बहुतांश भागात हलका पाऊस होत असून, पावसाळी स्थिती कायम आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांमध्ये तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन ते चार दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे, रायगड जिल्ह्यात २५, २६ जूनला पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिकमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत घाट विभागांत दोन ते तीन दिवस काही प्रमाणात पाऊस असेल. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आदी भागांत, तर विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Story img Loader