वीजसेवेबाबत पावसाळी स्थितीत निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीने तयारी केली असून, पावसाळ्यातील वीज दुर्घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. अतिवृष्टी किंवा वादळामुळे विजेच्या बाबतीत कोणती दुर्घटना होण्याची शक्यता तसेच काही समस्या किंवा तक्रार असल्यास महावितरणच्या मध्यवर्ती सेवा केंद्रातील टोल फ्री क्रमांक २४ तास सुरू ठेवण्यात आले आहेत. या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क करावा, असेही कळविण्यात आले आहे.
पावसाळ्यामध्ये वादळ निर्माण झाल्यास वीजतारांवर, खांबांवर झाडे किंवा झाडाच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असतात. पूरस्थिती किंवा वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने महावितरणकडून सध्या सर्व विभागांमध्ये साधनसामग्रीने सज्ज असणारे फिरते पथक तयार ठेवण्यात आले आहे. पुणे परिमंडल कार्यालयासह रास्ता पेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडलांतर्गत सर्व विभागस्तरावर २४ तास कार्यरत राहणारे दैनंदिन नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले आहेत.
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामेही पूर्णत्वाकडे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या कामांसह वीजवाहिन्यांना थेट धोका निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणीही करण्यात येत आहे. खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेवर वीजवाहिन्यांपासून दूर असणारी, पण वादळी पावसात कोसळण्याची शक्यता असलेल्या झाडांच्या फांद्याही धोकेदायक ठरू शकतात. त्यामुळे संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेऊन या फांद्यांची छाटणी करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही महावितरणने कळविले आहे.
तक्रार किंवा माहिती अशाप्रकारे कळवा
पुणे विभागातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅन्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेबाबत तक्रार किंवा तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती कळविता येणार आहे. महावितरणच्या टोल फ्री केंद्रामध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वत:चे कोणतेही तीन मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. हे क्रमांक नोंदविल्यानंतर मोबाईल किंवा दूरध्वनी केल्यास इतर काहीही न सांगता केवळ तक्रारींचा तपशील सांगावा लागणार आहे. स्थानिक तक्रार निवारण केंद्र कायमस्वरूपी बंद केल्यामुळे ग्राहकांनी आता टोल फ्री क्रमांकावरच तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात वीज दुर्घटनांबाबत सतर्क राहा!
महावितरणच्या मध्यवर्ती सेवा केंद्रातील टोल फ्री क्रमांक २४ तास सुरू ठेवण्यात आले आहेत. या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क करावा, असेही कळविण्यात आले आहे.
First published on: 12-06-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season mseb supply