पाऊस आणि सततचे दमट वातावरण यामुळे गेल्या तीन आठवडय़ांपासून शहरात दम्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडल्याचे दिसून येत आहे. फुफ्फुस रोगतज्ज्ञांकडे तपासणीस येणाऱ्या दम्याच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे २० ते ३० टक्के रुग्ण नवीन असून ते प्रामुख्याने कोरडय़ा खोकल्याची तक्रार घेऊन येत असल्याचे निरीक्षण या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दम्याच्या रुग्णांमध्ये नेहमी दिसणाऱ्या लक्षणांमध्ये सध्या काहीसा फरक पडल्याचे दिसून येत असल्याचे फुफ्फुस रोगतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘दम्याच्या रुग्णांमध्ये छातीत घरघर होणे, दम लागणे ही लक्षणे नेहमी दिसतात. सध्या येणारे दम्याचे नवीन रुग्ण मात्र प्रामुख्याने कोरडा खोकल्याचे आहेत. ताप किंवा फ्लूने आजाराला होणारी सुरुवात आणि ताप बरा झाला तरी राहिलेला कोरडा खोकला अशी या रुग्णांची प्रमुख लक्षणे दिसतात. या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. ज्या रुग्णांना १५ ते २० दिवस तीव्र कोरडा खोकला असेल आणि औषधे घेऊनही तो बरा होत नसेल अशांनी दम्याची शक्यता पडताळून घेण्यासाठी तपासणी करून घ्यावी.’’
दम्यासाठी आधीपासून काटेकोर औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा त्रासही ढगाळ वातावरणामुळे वाढला असल्याचे निरीक्षण बालरोग व दमातज्ज्ञ डॉ. बर्नाली भट्टाचार्य यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या रुग्णांचा दमा वर्षभर औषधोपचारांमुळे नियंत्रणात राहतो अशा सुमारे ६० टक्के रुग्णांचा त्रास दमट हवेमुळे वाढून त्यांना कफाचा आणि अस्वस्थ वाटण्याचा त्रास होत आहे. अगदी लहान बालके, शाळेत जाणारी लहान वयाची मुले आणि वृद्ध या तीन वयोगटांत दम्याचा त्रास अधिक दिसून येत आहे. पावसाळ्यात पसरणारा श्वसनमार्गाचा विषाणूसंसर्ग आणि घरात भिंतीवर व विविध वस्तूंवर दमटपणामुळे वाढणारी बुरशी याचा दमेकरी लहान मुलांना विशेष त्रास होताना आढळत आहे.’’
 ‘दोन आठवडय़ांपर्यंत राहणारा कोरडा खोकला, सकाळच्या वेळात तसेच धावताना, व्यायाम करताना किंवा हसताना वाढणारा कफाचा त्रास हे लक्षण दम्याच्या रुग्णांमध्ये सर्रास दिसत आहे. पण असे असले तरी प्रत्येक वेळी कोरडा खोकला हे दम्याचेच लक्षण असेल असे नाही. अशा वेळी रुग्णाला दम्याचा काही इतिहास आहे का असे प्रश्न विचारले जातात आणि तपासणीनंतरच त्याला दमा आहे की नाही हे कळते,’ असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा