पिंपरी : सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. ज्या दिवशी सत्ता येते, त्या दिवसापासून सत्ता जाते. मला म्हणतात तुमच्या सभेला गर्दी होते. पण, मते मिळत नाहीत. पण, २००९ मध्ये १३ आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते काय, लोकसभेला उमेदवारांना लाखावर मते पडली होते. पण, प्रत्येकाचा काही काळ असतो. सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा होत होत्या. पण, मते किती पडत होती. त्यावेळी काँग्रेसशिवाय काय पर्याय होता. त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार श्रीरंग बारणे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, अमित ठाकरे, माजी नगरसेवक राहुल कलाटे आदी उपस्थित होते.
हेही वाचा- “खुनाचा आरोप होताच, राज ठाकरे फरार”, स्वत:च सांगितला जुना प्रसंग, म्हणाले…
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारिता आजही जिवंत आहे. मीही पत्रकारितेत काम केले आहे. मार्मिकमध्ये ब्लॉक लावण्याचे काम केले. तिथपासून ते आतापर्यंतच्या वृत्तपत्राच्या छपाईपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. पत्रकारिता पाहिली नाही. तर,अनुभवली आहे. पत्रकारितेतून राजकारणात आलो. आताची पत्रकारिता बघत आहे. पत्रकारिवेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका, मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे, लिहावे. आज अनेक पत्रकार वाया गेले आहेत. तेच महत्त्वाच्या हुद्यावर बसले आहेत. पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पूर्वी लपूनछपून करत होते. आता उघडपणे काम करत आहेत. हे लेबल लावलेले पत्रकार परिषदेत येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. हे काय म्हटला आणि तो काय म्हटला असेच प्रश्न विचारत आहेत. राजकारणाचा स्तर, भाषा बदलली आहे. तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. तुम्ही नाही दाखविल्यावर स्वच्छतागृहात बोलतील का, असेही ते म्हणाले.