मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी हजरजबाबीपणाने एका वाक्यात मिश्किलपणे उत्तर दिलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलेला पहायला मिळालं. राज ठाकरे रविवारी (८ जानेवारी) पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही.” या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा : तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…
“मला जे शिकवलं ते माझ्या वडिलांनी आणि बाळासाहेबांनी”
आणखी खोदून विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “मी शाळेत असताना काही व्यंगचित्रं काढत असे. आम्ही ब्रशने काम करणारी लोकं आहोत. त्यामुळे त्यावेळी माझी ब्रशची लाईन असेल किंवा एखादी राजकीय कल्पना निर्माण करणं असेल हे त्यांनी सुरुवातीच्या काळात पाहिलं असेल. त्यातूनच ते बोलले असतील. मला जे शिकवलं ते माझ्या वडिलांनी आणि बाळासाहेबांनी.”
हेही वाचा : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झाली, आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’
“नाक, कान, डोळे यांचा अभ्यास केल्याशिवाय व्यंगचित्र काढणं सोपं नाही”
“बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याने मी डेव्हिड लो या ब्रिटिश व्यंगचित्रकारांना खूप फोलो केलं. मी जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. व्यंगचित्र हे चित्रकलेतील शेवटची पायरी आहे. आधी नाक, कान, डोळे यांचा अभ्यास केल्याशिवाय व्यंगचित्र काढणं सोपं नाही,” असं मत राज ठाकरेंनी विचारलं.
“कुठला अवयव कुठे आहे एवढं कळलं म्हणजे बास झालं”
यावर मुलाखतकाराने आपण दोघेही जे. जे.चे विद्यार्थी आहोत असं सांगितलं. तसेच कमर्शिअल आर्टमध्ये अवयवांबाबत फार शिकवलं जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यावर राज ठाकरेंनी “आपण थोडेच डॉक्टर आहोत, कुठला अवयव कुठे आहे एवढं कळलं म्हणजे बास झालं”, असं म्हणत मिश्किल उत्तर दिलं.