महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाणे येथील उत्तर सभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुद्द्यावरुन मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच रविवारी राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना, ”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे,” अशी घोषणा केली. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या सभेबद्दल आणि नियोजित अयोध्या दौऱ्याबद्दल तुफान चर्चा सुरु असतानाच पुण्यामध्ये मात्र राज ठाकरेंना त्यांनीच काढलेल्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून बॅनरबाजी करत टोला लगावण्यात आलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे होर्डिंग पुण्यातील अलका टॅाल्कीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक येथे लावण्यात आले आहेत.
काय आहे या व्यंगचित्रामध्ये?
प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. ‘राममंदिर’ नव्हे…!” असं म्हणत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असंही लिहिलेलं दिसत आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनी काढलेले हेच व्यंगचित्र ट्विट करत सोमवारी राज यांच्यावर निशाणा साधलेला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?, अस प्रश्न सावंत यांनी विचारलेला.
दरम्यान, पुण्यामधील हे बॅनर्स नेमके कोणी लावले आहेत यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या बॅनर्सची तुफान चर्चा पुण्यात आहे.