महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना झालेत. राज आज दुपारी पुण्यात येत असून पुढील चार दिवस ते पुणे मुक्कामी असणार आहे. यावेळी पुणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते संवाद साधणार असून पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
पुण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या ते भेटी घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या मुक्कामात पुण्यात जाहीर सभा घेण्याचे नियोजन असून, ती कोठे घ्यायची, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेसाठी पोलिसांची परवानगी मागण्यासंदर्भातील हलचाली सुरु असल्याची माहितीही समोर येत आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर लगेच झालेल्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला पुण्यात भरघोस यश मिळाले होते. त्यावेळी मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत ही संख्या दोनवर येऊन ठेपली. यापरिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करण्याचे मनसेने ठरवले असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या या शहरातील राजकारणावर पुन्हा एकदा वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल, यासाठी मनसे प्रयत्नशील असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पक्ष बांधणीसंदर्भात काही मोठे निर्णय घेणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.