पिंपरीसह संपूर्ण महाराष्ट्रातील बेकायदेशीर बांधकामांबाबत आपली एकच स्पष्ट भूमिका आहे. ज्या नागरिकांना घरांसाठी म्हणून बिल्डरांकडून फसवण्यात आले, त्या नागरिकांच्या राहत्या घरांना संरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केलीच पाहिजेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंचवडजवळील वाल्हेकरवाडी येथील जाहीर सभेत केली.
मावळ लोकसभेचे शेकाप-मनसेचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ ठाकरे त्यांची सभा झाली. खासदार गजानन बाबर, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, शिरूरचे मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड, आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास जगताप यांचा पाठिंबा असून, त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारून स्वतंत्रपणे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांच्या प्रचार सभेत ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील शहरे उत्तम प्रकारे वाढली पाहिजे. शहरात राहताना, घरातून बाहेर पाऊल टाकताना आल्हाददायक वाटले पाहिजे. अनधिकृत बांधकामांबद्दल स्पष्ट भूमिका आहे. ज्यांना घरांसाठी म्हणून बिल्डरांकडून फसवले गेले. मग ते पिंपरी-चिंचवडचे असो, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिकचे असो, त्या नागरिकांच्या राहत्या घरांना संरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, इतर अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत जमीनदोस्त केली पाहिजेत. किती काळ आपण शहरे बकाल करणार आहोत, याचा विचार व्हावा. माणुसकीचा विचार मान्य आहे. मात्र, अनेक लोक गैरफायदा घेतात, त्यामुळे शहरांचा आकार बदलतो. आपण घेतलेली भूमिका भविष्यात सर्वाना पटेल, असे ते म्हणाले.
परप्रांतातून येणाऱ्या नागरिकांमुळे अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र जावे लागते आहे. दुर्दैवाने काही वेळा अनधिकृतपणे राहावे लागते. प्रशासनाने योग्य वेळी दखल घेतल्यास ही वेळ कोणावरही येणार नाही. अनधिकृत घरांमध्ये राहणे महाराष्ट्रातील कोणाही व्यक्तीला आवडणार नाही. मात्र, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या पिढय़ांचे काय करायचे, असा सवाल त्यांनी केला. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदार गजानन बाबर यांचीच उमेदवारी कापण्यात आली, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, आपणाला अपेक्षित असलेली कामगिरी लक्ष्मण जगताप करतील, असे ते म्हणाले.
अजितदादा, तटकरे यांची खिल्ली
राज ठाकरे यांनी अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली. महाराष्ट्रात जिथे दुष्काळ असेल तिथे अजित पवार यांना बरोबर नेले पाहिजे, अशी टीका त्यांनी धरणाबद्दलचे विधानाचा संदर्भ देत केली. कामे करण्याच्या नावाखाली तेच-तेच रस्ते बांधतात. नवनवीन टेंडर काढून नको ते उद्योग केले जातात, असे सांगत तटकरे यांनी स्वत:च्या शिक्षणाविषयी दिलेली परस्परविरोधी माहिती ठाकरे यांनी वाचून दाखवली. खासदाराला नगरसेवकाची कामे सांगितली जातात. शिवाजीराव आढळरावांनी कचऱ्याच्या गाडय़ा भेट दिल्या, हे खासदारांचे काम नाही. खासदाराचे नक्की काम काय आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

Story img Loader