लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुण्यात राज ठाकरे यांच्या एकाच दिवशी दोन सभांचे नियोजन असले, तरी एकाच दिवशी झालेल्या मागील दोन सभांचा पूर्वानुभव पाहता एकच मोठी सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारात राज ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले आहे. शर्मिला ठाकरे व मनसेने आमदारही पायगुडे यांच्यासाठी प्रचारात उतरले आहेत. राज यांनी गुढीपाडव्याला पुण्यातूनच सभा घेऊन पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर पायगुडे यांच्या प्रचारार्थ ६ एप्रिलला त्यांनी येरवडा व कोंढवा या ठिकाणी दोन सभा घेतल्या. या सभांच्या दिवशी टी-२० क्रिकेटचा भारत व श्रीलंका संघाच्या दरम्यान अंतिम सामना होता. दोन्ही सभांना श्रोत्यांची उपस्थिती असली, तरी राज ठाकरे यांच्या सभांना होणारी अपेक्षित गर्दी झाली नव्हती. कोंढव्यातील सभेला क्रिकेटच्या सामन्याचा सर्वाधिक फटका बसला.
शहरात एकाच दिवशी पक्षाच्या लागोपाठ दोन सभा घेण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे पहिल्या सभेतीलच मुद्दे दुसऱ्या सभेत होते. त्यामुळे या सभा रंगल्या नाहीत, असे बोलले जाते. लागोपाठ सभा घेतल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली. हे सर्व मुद्दे लक्षात घेता शेवटच्या टप्प्यात एकाच दिवशी दोन नव्हे, तर एकच मोठी सभा घेण्याचा विचार सुरू आहे.
पक्षाच्या वतीने यापूर्वी शेवटच्या टप्प्यात १४ एप्रिलला पर्वती मतदार संघात मुक्तांगण शाळेच्या मैदानावर, तर त्यानंतर कोथरूड येथे पौड रस्त्यावरील जीत मैदानावर राज यांची सभा होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दोनऐवजी एकच सभा व्हावी, असे पक्षातील अनेकांचे मत आहे. त्यानुसार कोथरूड येथे एकच सभा घेण्याबाबत सध्या चर्चा करण्यात येत आहे.
पुण्यात राज ठाकरे यांच्या दोनऐवजी एकच सभा?
शहरात एकाच दिवशी पक्षाच्या लागोपाठ दोन सभा घेण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे पहिल्या सभेतीलच मुद्दे दुसऱ्या सभेत होते. त्यामुळे या सभा रंगल्या नाहीत, असे बोलले जाते.
First published on: 11-04-2014 at 03:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray meeting mns election