पिंपरी चिंचवड येथील १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, उद्योग, माध्यमं, व्यंगचित्रे यावर भाष्य केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील प्रभावावर राज ठाकरेंना विचारण्यात आल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय राज्यातील कोणत्याही पक्षाला राजकारण करत येत नाही. याकडे कसं पाहता, असं विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव असणारी ही दोन माणसे आहेत. जुन्या चित्रपटांच्या कथा सांगता येतात, पण नव्या नाही. कारण, तेव्हा दुसरं काहीच नव्हतं. तसेच, ही महाराष्ट्रातील दोन व्यक्तीमत्व तेव्हाच्या काळात डोक्यात बसली असून, अजूनही चालूच आहेत,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राजकारणात पैशांचा खेळ सुरु आहे. मग, तरुणांची राजकारण कसं पडायचं? यावर राज ठाकरेंनी म्हटलं की, “राजकारणात पैसे असतात हे मान्य आहे. पण, मनही जिंकावी लागतात. त्याशिवाय तुम्ही कसं पुढं जाणार. महाराष्ट्रातील ९९ टक्के लोकांना मत देण्यासाठी पैसे देणार का? राजकारणी लोकांकडून काही होत नसल्याने मतदानाचा आकडा घसरत आहे. राजकारण म्हणजे फक्त निवडणूक लढवणे नव्हं, तर त्यात विविध अंग असतात. त्या क्षेत्रात तुम्ही काम करु शकता,” असं राज ठाकरे म्हणाले.