मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड मत मांडलं आहे. राज ठाकरे पुण्यात १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परदेशातील माध्यमांवर २०० ते ३०० वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल चर्चा करण्यात येत नाही. पण, आपल्याकडं ५० ते १०० वर्षापूर्वीच्या वादावर माध्यमांवर चर्चा घडवली जाते, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, “राजकीय स्थिती लयाला गेली आहे. जाती-जाती तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना आतमध्ये खेचणं हे राजकारण नव्हे. कोणालाही वाटेल मी इतिहास तज्ज्ञ आहे. कोणीही बोलतोय, संदर्भ देतोय, काहीही चालू आहे. मागचा पुढचा विचार करायचा नाही, कारण प्रसारमाध्यमं दाखवण्यासाठी बसले आहेत. त्यांनी दाखवणे बंद केल्यावर सर्वांची थोबाडं बंद होतील.”

हेही वाचा : राज ठाकरेंनी सोशल मीडियावर कमेंट्स करणाऱ्यांची घेतली फिरकी; म्हणाले, “त्यावर आता…!”

“महाराष्ट्रातील विद्यार्थी, शाळा, शेतकरी आणि अन्यही भरपूर प्रश्न आहेत. ते सोडून राणे, राऊत काय बोलले हे दाखवलं जातं. जनतेला याचं काय पडलं आहे. त्यामुळेच हल्ली फार बोलत नाही. एक-दोन महिन्यातून काही बोललो तरच बोलतो. शरद पवार म्हणतात, मध्येच येतात आणि बोलतात. पण, त्याचं कारण हेच आहे,” असं परखड मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray react maharashtra politics shinde fadnavis government and thackeray pawar ssa