महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. “शरद पवार येथे मंचावर आले, तर मी त्यांच्या वाकून पाया पडेल,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मराठी चित्रपट सृष्टीत कलाकारांनी एकमेकांना आदराने बोलणं गरजेचं आहे. एकमेकांची नाव आदराने घेतली पाहिजेत. सध्या नको त्या नावाने एकमेकांना हाका मारल्या जातात. यामुळे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत केवळ कलावंत आहेत. इतर राज्यात मात्र स्टार आहेत. कारण ते एकमेकांना आदराने हाका मारतात, बोलतात.”
“रजनीकांत आणि इलाहीराजा हे रात्री दारू प्यायला बसतील, पण…”
“मराठी कलाकारांनी एकमेकांना आदरणाने हाक मारली पाहिजे. सध्या मी बघतोय आताचे कलाकार हे नको त्या नावाने हाका मारतात. इतर राज्यातील कलाकार हे एकमेकांचा आदर करताना दिसतात. अभिनेता रजनीकांत आणि इलाहीराजा हे रात्री दारू प्यायला बसतील, पण दुसऱ्या दिवशी सिनेमा सेटवर आदराने आणि सर या नावाने हाका मारतील,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
“…तर मी शरद पवारांच्या वाकून पाया पडेन”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “असा मानसन्मान आपल्या मराठी कलाकाराने एकमेकांना द्यावा. मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ यांना मामा म्हटलं जातं. अरे पण ते तुमचे सख्खे मामा आहेत का? त्यांना आदराने अशोक सराफ सर म्हणा. राजकीय भाषेत सांगायचे झाल्यास इथे शरद पवार आले, तर मी त्यांच्या वाकून पाया पडेन. तीच आपली संस्कृती आहे.”
हेही वाचा : “…म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही”, नाट्यसंमेलनात राज ठाकरेंकडून ‘त्या’ कलाकारांची कानउघडणी
“ते महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आहेत. मी राजकीय व्यासपीठावर त्यांच्यावर नक्की बोलेन. मात्र, समोर आल्यावर त्यांना मानसन्मान देईन,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.