पुणे : महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २८८ पैकी १२८ जागा लढविलेल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभेच्या मैदानात उतरले होते, मात्र मतदारांनी नाकारल्याने त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदार संघातून मनसेने उमेदवार निवडणुकीत उतरविले होते, मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेरच्या टप्प्यात मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. बिनशर्त हा पाठिंबा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जाहीर केले होते. लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसेला विधानसभेच्या निवडणुकीत भाजप तसेच महायुतीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून मदत केली जाईल, असे वाटत होते. विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याच्या काही जागा मनसेला देऊन लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करेल, असा विश्वास मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होता. मात्र भाजपसह महायुतीने मनसेला शेवटपर्यंत खेळवत ठेवले.

हेही वाचा >>> हरित क्रांतीतील स्वामिनाथन यांच्याप्रमाणेच जैवइंधन क्रांतीत प्रमोद चौधरींचे मोठे योगदान! गडकरी यांचे गौरवोद्गार

महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवली जाईल, या भ्रमात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले. त्यामुळे निवडणुकीची फारशी तयारी झाली नाही. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. मात्र एकही जागा मनसेला मिळाली नाही. निवडणुकीत पक्षाची वाताहात झाली असून , कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पुण्यात बैठक बोलवण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक उद्या ( गुरुवारी) होणार आहे. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता असून पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा >>> कार्ला गडावर जात आहात ? …रज्जू- मार्गाने जा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्या पाठोपाठ आता पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील मनसेचे पराभूत उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार असून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या पुढील काळात पक्षाची भूमिका काय असावी, या बाबतही चर्चा होणार आहे. शहर पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले.

लोकसभेला भाजपला जाहीर पाठींबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे केले होते. पुणे शहरातील कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी दोन वेळा जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा समाना करावा लागला आहे. काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत.

पुढील काही महिन्यात राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्यात सत्ताधारी  होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर मनसेला पक्ष पातळीवर काही कठोर भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. संघटनात्मक बदल हे पक्षात करावे लागणार असून पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिस्त देखील लावावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या पराभवाची कारणे लक्षात घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मचिंतन बैठकीच्या निमित्ताने सर्व पराभूत उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray to conduct mns workers meeting in pune after defeated in maharashtra assembly election pune print news ccm 82 zws