महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत असून राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
“महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
“…तेव्हा सर्वांचा शहांमृग झाला होता”
दरम्यान, घटनेच्या विरोधात जाऊन एकाच राज्याला प्राधान्य दिलं जातंय असं वाटतं नाही का? असा प्रश्न विचारला असता, “हे मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो. मात्र, त्यावेळी सर्वांचा शहांमृग झाला होता”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले, “माझं आजही म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे एकसमान नजरेनं बघितलं पाहिजे. आपण गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं, हे एका पंतप्रधानला शोभा देत नाही”
हेही वाचा – राज ठाकरेंनी सोशल मीडियावर कमेंट्स करणाऱ्यांची घेतली फिरकी; म्हणाले, “त्यावर आता…!”
…म्हणून ‘लाव रे तो व्हिडीओ’ सुरू केलं होतं
“२०१४ ची माझी भाषणं काढून बघितली तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं, असं मी म्हणालो होतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावर म्हणून तुम्ही २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ सुरू केला होतं का?’ असं विचारलं असता, “एकाद्या भूमिकेला विरोध करणं हे चुकीचं नाही. जर त्या व्यक्तीने चांगली गोष्ट केली तर त्यांचे अभिनंदन करावं इतका मनाचा मोठेपणाही तुमच्याकडे असावा लागतो. २०१४ नंतर देशात जे राजकीय स्थित्यंतर झालं त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यामुळेच ‘लाव रे तो व्हिडीओ’ची भूमिका घेतली होती. मात्र, २०१९ नंतर राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० अशा अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे अभिनंदनही मी केलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.