मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडला यावे, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मनसैनिकांची इच्छा सोमवारी पूर्ण झाली. तथापि, दिवसभराच्या दौऱ्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारीच दौरा आटोपता घेतला. काम वाढवा, पक्ष वाढवा आणि कार्यतत्पर व्हा, असे आवाहन करत लोकांनी तुम्हाला निवडले पाहिजे असे काम करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पिंपरी-चिंचवडच्या बहुचर्चित दौऱ्यासाठी राज ठाकरे सकाळी शहरात आले. चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये चिंचवड आणि पिंपरी-भोसरी एकत्रित अशी मतदारसंघनिहाय चर्चा केली व नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तथापि, दुपारी होणारी पत्रकार परिषद रद्द केली. गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक राहुल जाधव, मंगेश खांडेकर, सचिन चिखले, सतीश फुगे आदींसह मोठय़ा संख्येने मनसैनिक होते. तथापि, शहराध्यक्ष मनोज साळुंके व त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. अनधिकृत बांधकामांविषयी पदाधिकाऱ्यांनी मुद्दे उपस्थित केले. तथापि, ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.
ठाकरे म्हणाले,‘‘लोकांपर्यंत जा, संपर्क वाढवा, सोशल नेटवर्किंगचे युग आहे. नागरिक जागरूक व लहान मुले देखील खूप हुशार झाली आहेत. कामे दाखवा तरच नागरिक स्वीकारतील. सामान्य नागरिकांना आमदार-खासदारांची गरज पडत नाही. आपल्याला नागरिकांची गरज असते, त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे.’’
मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांचे दूरध्वनी व मोबाईल क्रमांक तुमच्याकडे हवेत. महिलांच्या पाककलांसारख्या अन्य स्पर्धा घेतल्या पाहिजेत, अशा विविध सूचना त्यांनी केल्या.
साहेब नरमले!
राज ठाकरे नेहमीसारखे वागले नाहीत, ते नरमले, असे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. ते एखाद्यावर चिडतात, डाफरतात, असे यापूर्वीचे अनुभव आहेत. मात्र, या संपूर्ण बैठकीच्या दरम्यान त्यांच्यातील फरक जाणवला, ते आपुलकीने वागत होते, असे सांगण्यात आले.
काम वाढवा, पक्ष वाढवा आणि कार्यतत्पर व्हा- राज ठाकरे
दिवसभराच्या दौऱ्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारीच दौरा आटोपता घेतला. राज ठाकरे नेहमीसारखे वागले नाहीत, ते नरमले, असे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
First published on: 17-02-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey in pimpri