भारतीय जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आशेचा किरण आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे व घराणेशाही रोखण्याचे काम ते करत आहेत. अशीच त्यांची पाऊले पडत राहिल्यास ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, चाव्या जनतेच्या हातात असून जनताच निर्णय घेईल, अशी टिप्पणी अण्णांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर बोलताना केली.
चिखलीत एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अण्णा आले होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अण्णा म्हणाले, घटनेनुसार कोणीही निवडणुका लढवू शकतो. त्यानुसार ठाकरेही लढवू शकतात. मात्र, चाव्या जनतेच्या हातात असतात. ते उभे राहिले की मुख्यमंत्री होतीलच असे काही नाही. लोकपालची अंमलबजावणी व्हावी. भ्रष्टाचारी व गुंडांना रोखण्यासाठी ‘राईट टू रिजेक्ट’ कायद्याची गरज आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा चांगली आहे. मात्र, त्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. अरविंद केजरीवाल यांनी सत्य असेल त्याच्या मागे उभे रहावे. पुरावे असेल तरच एखाद्यावर आरोप करावेत. जामीन नाकारणे ही त्यांची चूक होती. ती लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधारणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा करिश्मा संपला आहे का, या प्रश्नावर, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर भाष्य करणे योग्य राहील, अशी टिप्पणी त्यांनी केली.
खळखळून हसतानाच अण्णांचे डोळेही पानावले!
नेहमी आंदोलने करताना दिसणारे, भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात तुटून पडणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वेगळे रूप िपपरी-चिंचवडला पहायला मिळाले. व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘आई’ या विषयावरील व्याख्यान ऐकत अण्णा दोन तास बसून राहिले. ते कधी भावूक झाले, तर कधी विनोदी शेरेबाजीवर खळखळून हसले. दु:खद प्रसंगाचे वर्णन ऐकतानाच अण्णांचे डोळे पाणावल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले.
चिखली प्राधिकरणात शिवतेजनगरला ‘आई’ महोत्सवात सोलापूरच्या व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘श्यामची आई आज हरवली आहे’ या विषयावरील व्याख्यान होते, त्यासाठी अण्णा प्रमुख पाहुणे होते. आमदार विलास लांडे, ‘आप’चे नेते मारूती भापकर, नगरसेवक संजय वाबळे, अजय सायकर आदींसह मोठय़ा संख्येने श्रोत्रे उपस्थित होते.
रामतीर्थकर यांनी व्याख्यानात हिंदूू संस्कृती, पाश्चिमात्यांचे अंधानुकरण, महिलांचे प्रश्न, बदलती पिढी, आधुनिक विचारसरणी, सासू-सुनेचे संबंध, आईचे महात्म्य, पुरूषी मानसिकता, आधुनिक तरुणींचे पेहराव व त्यांचे विचार अशा विविध मुद्दय़ांवर परखड भाष्य केले. कधी कान टोचून तर कधी मायेने वास्तव मांडून त्यांनी आपले मुद्दे पटवून दिले. ते ऐकून श्रोत्रे विशेषत: महिला अंतर्मुख झाल्या, अनेकींचे डोळे पाणावले. अण्णा सुरुवातीपासून व्याख्यानात रमले होते. ते कधी भावूक झाल्याचे, शून्यात हरवून गेल्याचे तर एखाद्या क्षणी त्यांचे डोळे पानावल्याचेही उपस्थितांनी पाहिले. मनोगतात अण्णांनी व्याख्यात्याचे भरभरून कौतुक केले. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण, टीव्ही संस्कृती, चैनबाजीचे आकर्षण आपल्या अध:पतनास जबाबदार आहे. भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. खाणे-पिणे म्हणजे जीवन नाही. आपल्या नैतिक कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, चारित्र्य जपले पाहिजे. समाजासाठी अपमान पचवता आला पाहिजे. आपण आनंद बाहेर शोधतो. प्रत्यक्षात तो आत असतो. दुसऱ्याला सुखी करणे म्हणजे सुखप्राप्ती आहे, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा