महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या महिन्याच्या सुरुवातील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात दिलेलं भाषणामधील मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असं असतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरुन निशाणा साधलाय. पुण्यामधील पत्रकार परिषदेत बोलताना आठवलेंनी राज ठाकरेंना झेंड्याचा रंग बदलण्यावरुन सुनावलं आहे. तसेच राज ठाकरेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचंही आठवले म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवा घालून भोंग्याला विरोध करु नये
“सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे. मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही. पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा आहे. समाज अल्पसंख्याक आहे. धमकीची भाषा कोणी करू नये,” असं आठवले म्हणाले आहेत.

राज यांची भूमिका चुकीची
“३ मेला जर कोणी मशीदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते मशीदींचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो पण आम्हला दादागिरी येते. पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोडा वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे,” असं आठवले म्हणाले. “अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा,” असं मत आठवलेंनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलेलं.

नक्की वाचा >> शिवसेना-भाजपा युतीबद्दल आशावादी असणाऱ्या आठवलेंची आता थेट काँग्रेसलाच ऑफर; म्हणाले, “नाना पटोलेंनी सोनिया गांधींशी बोलून…”

…म्हणून भाजपाने राज ठाकरेंना सोबत घेऊ नये
“भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे. समाजात शांतता राखवी हा आमचा प्रयत्न आहे,” असं आठवलेंनी स्पष्ट केलंय. तसेच पुढे बोलताना, “मनसे आरपीआयची जागा भाजपामध्ये घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपाने सोबत घेऊ नये, असं माझं मत आहे. आमचं अस्तित्व संपणार नाही,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

…तर शिवसेना सोडायला नको होती
“राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळा सुनियोजित असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. त्यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती,” असा टोलाही आठवलेंनी लगावलाय. “शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होत, पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असंही आठवले म्हणाले.

झेंड्यावरुन साधलेला निशाणा
आठलेंनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या बदलेल्या झेंड्यावरुन राज यांच्यावर निशाणा साधलेला. “पूर्वी त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग, भगवा रंग, हिरवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग होते. त्यामुळे आता त्यांचे रंग बदलतायत हे बरोबर नाहीय. सगळ्या रंगाना घेऊन पुढे जायचं आहे, एखाद्या रंगाला घेऊन पुढे जाण्याचा विषय नाहीय,” असा टोलाही आठवलेंन लगावला. पुढे बोलताना, “आम्हाला भगवा रंग प्यारा आहे. भगवान गौतम बुद्धांनी भगव्या रंगाला फार महत्व दिलं होतं. त्यामुळे भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो भगवा पडतो त्याने त्याने मुघलांना आणि दुश्मनांना चारी मुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे भगवा घ्यावा. पण वाद होण्यासाठी तो अंगावर घेऊ नये. समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं आवश्यक आहे,” असं आठवले म्हणाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thakceray should not have leaved shivsena says ramdas athawale svk 88 scsg
Show comments