‘‘राजा परांजपे यांच्या काळापेक्षा आजच्या काळात चित्रपटाचे तंत्र सुधारले आहे. परंतु तरीही चांगले चित्रपट निघत नाहीत. आताचे दिग्दर्शक अभिनय करून दाखवू शकत नाहीत. मकरंद अनासपुरेसारखे आजचे अभिनेते खूप चांगले कलाकार आहेत. पण या कलाकारांना शिकवणारे कुणीच नसल्यामुळे ते त्याच-त्या पद्धतीने अभिनय करत जातात,’’ असे मत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी व्यक्त केले.
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राजा परांजपे सन्मान रविवारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते रमेश देव आणि सीमा देव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे आणि अजय राणे या वेळी उपस्थित होते.
रमेश देव म्हणाले, ‘‘मी दहावीनंतर पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिकला चाललो होतो. जाताना भावाकडून पैसे उकळावेत म्हणून पुण्याला आलो आणि त्याच्याबरोबर घोडय़ांची रेस पाहायला गेलो. तिथे मी राजा परांजपे यांना प्रथम भेटलो. त्यांनी मला कोणत्या घोडय़ावर पैसे लावू, असे विचारले आणि मी सांगितलेले तीन घोडे लागोपाठ जिंकले. त्या वेळी ते ‘आंधळा मागतो एक डोळा’ हा चित्रपट करत होते. त्यांनी अचानक मला चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्याविषयी विचारले आणि माझ्या जीवनाला वेगळेच वळण मिळाले. ते केवळ अभिनयाचे गुरू नव्हते. जीवनात वागावे कसे हेही त्यांनी मला शिकवले. महाविद्यालयात असताना मी चित्रपटांसाठी माणसे उपलब्ध करून देणारा ‘एक्स्ट्रॉ सप्लायर’ म्हणून काम करात असे. राजाभाऊंनी माझ्या आयुष्यासाठी सुंदर ‘फ्लायओव्हर’ तयार केला आणि चित्रपटसृष्टीत माझे पाऊल स्थिर झाले. आताच्या दिग्दर्शकांना अभिनय करून दाखवता येत नाही. त्यामुळे आताच्या अभिनेत्यांना शिकवणारे कुणी उरलेले नाही. गुरूशिवाय चित्रपटसृष्टीत गती नसते.’’
सुलोचना दीदी म्हणाल्या, ‘‘भालजी पेंढारकर आणि राजा परांजपे यांच्याप्रमाणे नवीन कलाकारांना घेऊन काम करण्याचे धाडस आणि त्यांना शिकवण्याची ताकद त्यांच्यानंतर कुणाकडेच नव्हती,’’
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2014 रोजी प्रकाशित
राजाभाऊंसारखे कलाकारांना शिकवणारे आज कुणीच नाही – रमेश देव
आजच्या काळात चित्रपटाचे तंत्र सुधारले आहे. परंतु तरीही चांगले चित्रपट निघत नाहीत. आताचे दिग्दर्शक अभिनय करून दाखवू शकत नाहीत. कलाकारांना शिकवणारे कुणीच नसल्यामुळे ते त्याच-त्या पद्धतीने अभिनय करत जातात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-04-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raja paranjape ramesh dev honoured