आमच्या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अभियांत्रिकी पदवी संपादन करून संगणक जुळणी करणारा मुलगा.. सुई टोचून घेण्याची भीती वाटणारा मुलगा जेव्हा डॉक्टर होतो.. शाळेतून शिक्षण पूर्ण केलेली अपंग मुलगी आपल्या मुलांना याच शाळेत शिकविण्यासाठी पुन्हा गावी परतते.. अशा यशोगाथा अनुभवावयास मिळाल्या. अन् आमच्या तीन तपांच्या कामाचे सार्थक झाले, अशी भावना डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
बाळवृंद फाउंडेशनतर्फे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते चिखलगाव (जि. दापोली) येथे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या दांडेकर दांपत्यास यंदाचा सार्थक पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी परदेशी, सल्लागार प्रकाश धारप आणि सचिव मुकुंद परदेशी या वेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आमच्या कामाचे नानाजी देशमुख हे आदर्श आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही झाडाखाली संसार सुरू केला. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवून झाडाखालीच सुरू केलेल्या शाळेला संयुक्त राष्ट्रसंघाचे संलग्नत्व मिळाले आहे. शालेय जीवनात आपण शिकत शिकत जगतो. असे शिक्षण मिळाले तर विद्यार्थ्यांनाही आनंद होईल, असे राजा दांडेकर यांनी सांगितले. सामाजिक काम करायचे असे ठरवून नाही तर आमच्या आनंदासाठी काम करायचे हे निश्चित केले. सरकारी काम ही यंत्रणा असते. मात्र, गरजा ओळखून केलेले काम ही रचना असते, याची जाणीव चिखलगावात काम करताना झाली, असे रेणू दांडेकर यांनी सांगितले.
शहरात राहून खेडेगावाबद्दल काही केले पाहिजे, असे बोलणारे अनेक जण असतात. पण, व्यक्तिगत सुखापलीकडे जाऊन दांडेकर दांपत्याने समाजासाठी केलेले काम आदर्शवत असेच आहे. माझ्या जुन्या मित्राला पुरस्कार प्रदान करताना मीच सन्मानित झालो, अशी भावना गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

Story img Loader