मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे प्रसिद्ध साहित्यिक आणि अक्षर मानव चळवळीचे प्रमुख राजन खान यांना समाजप्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त २२ मार्च रोजी एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते राजन खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सय्यदभाई आणि सरचिटणीस प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून २२ मार्च रोजी होणाऱ्या एकदिवसीय चर्चासत्रात मुस्लीम समाजाचे शैक्षणिक-आर्थिक आणि महिलांचे प्रश्न, अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि धर्मनिरपेक्षतेसमोरील आव्हाने आणि मुस्लीम समाजासमोरील आव्हाने या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार झहीर अली, जावेद आनंद, इरफान इंजिनिअर, अब्दुल कादर मुकादम, प्रा. आशा अपराद, ऐनूल आत्तार, डॉ. बी. टी. काझी, प्रा. जमीर शेख, प्रा. अझरुद्दीन पटेल, प्रा. बेनझीर तांबोळी, तमन्ना शेख, प्रा. सायरा मुलाणी, प्रा. आय. एन. बेग, बशीर शेख आणि हुसेन जमादार सहभागी होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
ज्युएनाईल जस्टीस अॅक्ट २००७ कायद्यानुसार शबनम हाश्मी विरुद्ध भारतीय संघराज्यच्या जनहित याचिकेवर निवाडा देताना मुस्लीम व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकते असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे स्वागत करण्यात येत आहे. हा कायदा ऐच्छिक न ठेवता अनिवार्य करावा, अशी मंडळाची भूमिका असून घटनेच्या ४४ व्या कलमानुसार समान कौटुंबिक कायदा आणण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल ठरेल, असे सय्यदभाई आणि प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा