पुणे : राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात पकडले. त्याच्याकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
नाथूराम जीवनराम जाट (वय ५२, रा. असावरी, जि. नागोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाट याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागातील अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाारी गस्त घालत होते. त्या वेळी जाट तेथून निघाला होता. त्याच्याकडे पिशवी होती. पोलिसांच्या पथकाने संशयावरुन त्याची चौकशी केली. पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत अफू सापडली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, दयानंद तेलंगे पाटील, संदीप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली.
झटपट पैसे कमाविण्यासाठी अफू विक्री
आरोपी नाथूराम जाट मूळचा राजस्थानातील आहे. तो पूर्वी फर्निचरचे काम करायचा. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू विक्रीस आणली होती. त्याने आतापर्यंत कोणाला अफू विक्री केली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.