पुणे : बजाज ऑटोकडून सीएनजी दुचाकी सादर केली जाणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सीएनजी दुचाकी १८ जूनला सादर करण्याची घोषणा शुक्रवारी केली. बजाज ऑटोने पल्सर एनएस ४०० झेड ही दुचाकी शुक्रवारी सादर केली. यावेळी बोलताना बजाज म्हणाले की, इंधनाच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांना परवडेल अशा इंधनावरील दुचाकीचा विचार सुरू होता. त्यातून सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीची कल्पना समोर आली. सीएनजीवर चालणाऱ्या मोटारी आणि तीनचाकी वाहनांमुळे इंधन खर्चात मोठी कपात होते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सीएनजी दुचाकीचा विचार करण्यात आला. बजाजची सीएनजी दुचाकी १८ जूनला सादर केली जाणार आहे. या दुचाकीमुळे इंधन खर्चात सुमारे ५० टक्के बचत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आयटी हब हिंजवडीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, पैशांचे अमिश दाखवून वेश्याव्यवसाय

पल्सर एनएस४०० झेड ही स्पोर्ट्स बाईक श्रेणीतील ही दुचाकी असून, त्यामध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्टे आहेत. पल्सर एनएस ४०० झेड ही एनएस मालिकेतील दुचाकी आहे. आधी कंपनीने एनएस १२५, एनएस १६०, एनएस २०० हा दुचाकी सादर केल्या होत्या. आता सादर करण्यात आलेल्या दुचाकीच्या रचनेतही काही बदल करण्यात आले आहेत. या दुचाकीची इंजिन क्षमता ३७३.२७ सीसी आहे. याचबरोबर तिच्यामध्ये वेगवेगळे राईड मोड आणि स्लीपर क्लच आहे. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण आणखी वाढून चालकाला चालविण्याचा चांगला अनुभव मिळतो. ही दुचाकी चार रंगात उपलब्ध करून देण्यात आली असून, तिची किंमत दिल्लीत १ लाख ८५ हजार रुपये (एक्स शोरूम) आहे. सुमारे महिनाभर या सवलतीच्या किमतीत ही दुचाकी उपलब्ध होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajeev bajaj on bajaj s cng two wheeler launch date 18 th june 2024 pune print news stj 05 css