शिरुर :- शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर उपसभापतीपदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणूकीनंतर होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

यापूर्वी खरेदी विक्री संघावर माजी आमदार ॲड. अशोक पवार यांचे वर्चेस्व होते. खरेदी विक्री संघाचा निवडणूकीत १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर २ जागा माजी आमदार अशोक पवार यांच्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर ५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात ५ ही जण अशोक पवार यांचे निवडून आले होते. यामुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक चुरशीची होईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात सभापती व उपसभापतीपदाची निवडी बिनविरोध झाली. खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीपूर्वी विद्यमान सभापती राजेंद्र नरवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

आज सभापतीपदाच्या निवडीकरीता राजेंद्र नरवडे व उपसभापतीपदाकरीता बाळासाहेब नागवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, कात्रज जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्ननील ढमढेरे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्ननील गायकवाड, बाजार समितीचे माजी सदस्य आबाराजे मांढरे, पक्ष निरीक्षक अण्णा महाडिक, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरुर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, माजी सभापती शरद कालेवार, माजी सरपंच प्रकाश थोरात, श्रीनिवास घाडगे, तज्ञिका कर्डिले, शृतिका झांबरे आदी उपस्थित होते.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्याचा संकल्प सर्वानी केला होता व तसे वर्चस्व निर्माण केले. अलीकडचा काळात राजकारण्यात द्वेष वाढत चालला आहे अशी खंत व्यक्त केली.

खरेदी विक्री संघाच्या कार्याचा नवीन इतिहास नूतन पदाधिकारी यांनी घडवावा. खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्वानी एकत्रित लढली तशीच आगामी काळात बाजार समितीची निवडणूक एकजीवाने लढवावी, असे आवाहन केले.

तालुकाध्यक्ष रवि काळे म्हणाले की खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केले आहे. आदर्श असे काम खरेदी विक्री संघ ५ वर्षात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्हावरा येथे खरेदी विक्री संघाच्या जागेत व्यापारी संकुल उभारावे असे आवाहन त्यांनी केले.

नूतन सभापती राजेंद्र नरवडे म्हणाले की पक्षाने सभापतीपदाची संधी दिली त्या संधीचे सोने करु. पक्षाशी प्रामाणिक राहील व चांगला असा आदर्श खरेदी विक्री संघ शिरुरचा करेल.

निवडीनंतर उपसभापती बाळासाहेब नागवडे म्हणाले तीसरा वेळेस उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडेल.

जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे म्हणाले की राज्यात महायुतीचे सरकार असून तालुक्यातील निवडणूकींना महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित सामोरे जातील.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, निवडणूकीकरीता निरीक्षक म्हणून आलेले आण्णासाहेब महाडिक, संचालक सुरेश ढवळे आदीची भाषणे झाली. आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी मानले.