जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांचा संवाद
राजस्थानातील कमी पावसाच्या प्रदेशात अनेक नद्या आणि ओढे बारमाही वाहते करण्याची किमया लोकसहभागातून साधणारे लोकबिरादरी संस्थेचे प्रमुख डॉ. राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधण्याची संधी ज्ञानप्रबोधिनीने २४ मे रोजी उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाण्यासंबंधी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांच्यासमवेत त्यांची चर्चा होणार आहे.
ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रबोधिनीच्या पाणीविषयक कामाला जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांची सोमवारी (२३ मे) वेल्हे तालुक्यात भेट योजलेली आहे. त्याला जोडूनच संस्थेच्या सभागृहात २४ मे रोजी राजेंद्रसिंह हे नदीखोरे संदर्भात गावाचा जलविकास आराखडा या विषयावर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. गरवारे महाविद्यालयाचे सभागृह येथे २४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांच्या हस्ते राजेंद्रसिंह यांना भगीरथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने ‘महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर दूरगामी उपाय’ या विषयावर राजेंद्रसिंह यांचे व्याख्यान हाणार आहे, अशी माहिती सुभाष देशपांडे आणि मोहन गुजराथी यांनी सोमवारी दिली.
पुणे जिल्ह्य़ातील शिवगंगा आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यातील १३७ गावांमध्ये ज्ञानप्रबोधिनी केली ५० वर्षे काम करीत आहे. सार्वजनिक विहिरी खोल करण्यापासून ११ गावंचा पाणलोट क्षेत्र विकास करून ती गावे टँकरमुक्त केली आहेत. अवर्षण प्रवण क्षेत्र विकास योजना जिल्हा परिषदेच्या निधीतून राबविताना शेततळी, नालाबांध, सिमेंट बंधारे अशी कामे पाच गावांत करण्यात आली. एका छोटय़ा नदीखोऱ्यात प्रदीर्घ काळ सातत्यपूर्ण करीत असलेल्या ज्ञानप्रबोधिनीच्या कामाची पाहणी करण्यासाठी राजेंद्रसिंह आवर्जून येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा