उद्योग – व्यापार क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था असलेल्या भारतीय उद्योग व्यापार मंडळ या देश पातळीवरील संस्थेच्या राष्ट्रीय सहमंत्री या पदावर प्रसिद्ध व्यापारी व जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबाबतचे पत्र भारतीय उद्योग व्यापार मंडळ या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल गुप्ता, राष्ट्रीय अध्यक्ष विजय प्रकाश जैन व राष्ट्रीय वरिष्ठ महामंत्री मुकुंद मिश्रा यांनी राजेश शहा यांना प्रदान केले. या निवडीमुळे सध्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील अनेक व्यापारी, सामाजिक संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर सक्रिय असणाऱ्या राजेश शहा यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
हेही वाचा >>> पुणे : ड्रोनद्वारे २६ हजार गावांचे सर्वेक्षण पूर्ण ; नऊ लाख मिळकत पत्रिकांचे वाटप
राजेश शहा यांनी पूना मर्चंट चेम्बरचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पूना ब्लाईन्ड मेन्स असोसिएशन व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल या संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. सन २००३ पासून सलग महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पहात आहेत. श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या संस्थेचे महासचिव आहेत. श्री महावीर जैन विद्यालय, पूना हॉस्पिटल, पूना गुजराती केळवाणी मंडळ, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इत्यादी सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे ते विश्वस्त आहेत.