पुणे : राजगुरुनगर भागात खाऊच्या आमिषाने दोन बालिकांवर अत्याचार, तसेच त्यांचा पिंपातील पाण्यात बुडवून खून करणाऱ्या उपाहारगृहातील कामगाराला राजगुरूनगर-खेड सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशाने आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असून, न्यायालयाने आरोपी कामगाराच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली. आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तसेच त्याचे डीएनए नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळावरचे सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली
खाऊच्या आमिषाने दोन बालिकांवर अत्याचार करुन त्यांना पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवून मारण्यात आले होते. २५ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. बालिकांवर अत्याचार करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राजगुरुनगर भागात संतप्त पडसाद उमटले होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या ५४ वर्षीय कामगाराला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
हे ही वाचा… पुणे : थेऊर गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी महिलेचा मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपी आणि पीडित बालिकांचे कपडे पुरावा म्हणून जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची तपासणी करण्यात आली आहे. त्याचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. आरोपीच्या पोलीस काेठडीचे हक्क अबाधित ठेऊन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील सतीश देशपांडे यांनी युक्तिवादात केली.