पुणे : ‘आपल्या अवती भोवती मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. सर्वांच्याच हाती लेखनी आली आहे. त्यामुळे लिखानाला आणि एकणूच भाषिक व्यवहाराला मर्यादा राहिली नाही. सगळा लोकव्यवहार मुबलेकतेमुळे विसविशीत झाला आहे. उदासीनतेची, सब चलता है अशी मानसिकता समाजात विशेषत: तरूणांच्याच निर्माण झालेली दिसते. भाषिक व्यवहार आक्रसत चाललेला आहे. भाषा जर व्यवहारात आली नाही तर टिकणार कशी?, अशा वेळी भाषा टिकवून ठेवण्यात माध्यमांचीही जबाबदारी महत्वाची आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित ‘दिवाळी अंक स्पर्धा २०२४’ चे पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि खांडेकर यांच्या हस्ते साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, संयोजक भास्कर जोशी आदी उपस्थित होते. या वेळी ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा’ पुरस्कार अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. तर ‘पुण्यभूषण उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंका’साठीचा पुरस्कार ‘साधना बालकुमार’ या दिवाळी अंकाला, एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘वास्तव’ (भूत विशेषांक) या दिवाळी अंकाला आणि इतर विभागातील पुरस्कार ‘आर्याबाग’ या दिवाळी अंकाला देण्यात आला.
‘मराठीत पाचशे-सातशे किंबहूना त्याहून अधिक दिवाळी अंक निघत असतील. मात्र, त्यातले किती अंक दर्जेदार असतात, असा प्रश्न पडतो. भाषेसह सगळा सामाजिक व्यवहार उदासीन, दर्जाहीन असा होत चालला आहे. याकडे गांभीर्याने, रोखठोकपणे आणि पारदर्शकतेणे पहिले गेले तरच लेखक, दिवाळी अंकही राहतील आणि भाषाही टिकेल. मराठीविषयी अभिमान वाटण्यापेक्षा प्रेम वाटले तर अनेक प्रश्न सुटतील,’ अशी भावना खांडेकर यांनी या वेळी व्यक्त केली.
आळेकर म्हणाले,‘मराठी भाषेविषयीची आपली संवेदना ठिसूळ होत चाललेली आहे. मराठी विषयीची तळमळ, संवेदना आतून निर्माण व्हायला हवी. मात्र, आजच्या तरुणाच्यांत अशी संवेदना निर्माण होताना दिसत नाही. सारे मराठी विश्व तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेले दिसते. सगळीकडे एक प्रकारे वैचारिक गारठा निर्माण झाला आहे. ही निराशाजनक स्थिती नसून वस्तुस्थिती झाली आहे.’
‘दिवाळी अंकात समकालात घडणाऱ्या सगळ्या घटनांचे प्रतिबिंब उमटत राहते. साहित्याला दिवाळी अंकांच्या मुळे मोठी चालना मिळाली आहे,’ असे प्रा. जोशी यांनी सांगितले. साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.