“कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल कलाम बनतो,” असं मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. “अल कायदातही सुशिक्षित तरुण आहेत आणि इन्फोसिसमध्ये देखील सुशिक्षित तरुण आहेत. तुमच्यावरचे संस्कार तुम्ही कोण होणार हे ठरवतो,” असंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदियाही उपस्थित होते.
राजनाथसिंह म्हणाले, “करोना आपत्तीनंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर वाढला आहे. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. शरीरासोबतच मनस्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. पदवी घेतल्यानंतर तुम्ही देशात, जगात काम कराल तेव्हा तुमच्या मनाची व्यापकता ठरवेल की तुम्ही लोकांना काय देणार?”
“कोट्याधीश घरात जन्मलेला आलेला एखादा लादेन बनतो, तर…”
“कोट्याधीश घरात जन्मलेला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन एपीजे अब्दुल कलाम बनतो. अल कायदातही सुशिक्षित तरुण आहेत आणि इन्फोसिसमध्ये देखील सुशिक्षित तरुण आहेत. तुमच्यावरचे संस्कार तुम्ही कोण होणार हे ठरवतो. करोना काळानंतर भारतीय वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर जगात वाढला. वैद्यकीय क्षेत्रावर कोणाची बळजोरी नव्हती, पण त्यांच्यावरच्या संस्कारांमुळे त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
“६० वर्षात महाराष्ट्राची जी प्रगती झाली ती सरकारची देण नाही”
डॉ. अभय फिरोदिया म्हणाले, “सन १९६० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर नव्हते. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राची जी काही प्रगती झाली ती सरकारची देण नसून येथील लोक, उद्योजकांच्या प्रयत्नांची देण आहे. १९३१ मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी देशात सर्वाधिक होता. १९६७ मध्ये बिहार राज्य गव्हर्नन्समध्ये देशात आघाडीवर होते. मग आता हे सगळं का बिघडले? ‘मोदी राज’मध्ये हा प्रवाह बदलला जातो आहे.”
हेही वाचा : विश्लेषण : भारतीय नौदलात आणखी दोन युद्धनौका… काय आहेत उदयगिरी आणि सुरतची वैशिष्ट्ये?
“देशाच्या औद्योगिक प्रगतीचा मी साक्षीदार”
“आता उत्तर प्रदेशातली कायदा सुव्यवस्था सुधारत आहे. बिहारही बदलतो आहे. उद्योग, रोजगार निर्मितीत ही राज्ये सुधारतील तेव्हा महाराष्ट्राला स्पर्धा करावी लागेल. देशाच्या औद्योगिक प्रगतीचा मी साक्षीदार आहे. काही नव्हते येथे. आता ब्लॉक चेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवी तंत्रज्ञानं येत आहे. या दृष्टीने विद्यापीठांना तयार राहावे लागेल,” असेही अभय फिरोदिया यांनी नमूद केलं.