बारामती, इंदापूर, तासगाव, नांदेड, सातारा यांसारख्या मतदारसंघांमध्ये आघाडीच्या बडय़ा नेत्यांच्या विरोधात विधानसभेत भिडण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. ‘‘शिवसेना व भाजपचे उमेदवार फार मागे आहेत, अशाच आघाडीच्या बडय़ा नेत्यांच्या विरोधात आम्ही उमेदवारी मागितली आहे. एकूण ३८ जागा मागितल्या असल्या, तरी त्यावर आम्ही अडून बसलेलो नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो,’’ असे शेट्टी म्हणाले. महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, की महायुतीतून आम्ही बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या सर्व चर्चा चुकीच्या आहेत. विधानसभेच्या जागावाटपाबाबत आमची अजून चर्चा झालेली नाही. सेना-भाजपकडे आम्ही ३८ जागा लढविण्याची तयारी दर्शविली आहे. पण, त्यावरच आम्ही आडून बसलो नाही. आम्ही अवास्तव जागा मागत आहोत, असे काही जण बोलत आहेत. मात्र, ते योग्य नाही. शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना ज्या भागामध्ये अत्यंत कमी मते मिळतात, त्या ठिकाणी तसेच आघाडी सरकारमधील बडय़ा नेत्यांच्या विरोधातून १४ जागा आम्ही लढण्यास तयार असल्याचे शिवसेना-भाजपला सांगितले आहे. त्यामध्ये बारामती, इंदापूर, इस्लामपूर, पलूस, तासगाव, दक्षिण कराड, सातारा, नांदेड आदी ठिकाणच्या बडय़ा नेत्यांच्या जागा आम्ही मागितल्या आहेत. त्या ठिकाणी भाजप-सेनेचे उमेदवार तीन ते पाच क्रमांकाच्याही खाली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम यांच्या बैठकीबाबत ते म्हणाले, की या बैठकीमध्ये कोणी कोणत्या जागा मागायच्या हे स्पष्ट होईल. एकच जागा दोघांनी मागू नये, यासाठी आम्ही ही बैठक घेत आहोत. महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ आलीच, तर स्वतंत्र लढणार का, या प्रश्नावर ‘‘स्वतंत्र लढण्याबाबत आताच भाष्य करीत नाही, पण आम्हाला लढण्याची सवय आहे,’’ असा टोला शेट्टी यांनी लगावला.
आम्ही ३८ जागांवर अडून बसलो नाही – राजू शेट्टी
बारामती, इंदापूर, इस्लामपूर, पलूस, तासगाव, दक्षिण कराड, सातारा, नांदेड आदी ठिकाणच्या बडय़ा नेत्यांच्या जागा आम्ही मागितल्या आहेत. त्या ठिकाणी भाजप-सेनेचे उमेदवार तीन ते पाच क्रमांकाच्याही खाली आहेत.
First published on: 07-08-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty press conference election demand