पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम
पुणे : राखी पौर्णिमेचा सण अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. मुंबईनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पुण्यातील राखी बाजारात यंदा शुकशुकाट जाणवत असून राखी व्यवसायावर परिणाम झाला आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातील राखी विक्रीची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. रविवार पेठेतील कापडगंज भागात राखी विक्रीची बाजारपेठ आहे. या भागात किरकोळ तसेच घाऊक स्वरुपात राखी विक्री केली जाते. येत्या सोमवारी (३ ऑगस्ट) राखी पौर्णिमा असून दरवर्षी राखी पौर्णिमेच्या आधी महिनाभर या भागात राखी विक्रीची तात्पुरती दुकाने थाटली जातात. या भागात मोठय़ा दुकानातून घाऊक स्वरुपात राखी विक्री केली जाते. कापडगंज येथील बाजारपेठेतून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच बेळगावमध्ये राखी विक्रीस पाठविली जाते. या भागातील व्यापारी पुण्यातील बाजारपेठेतून राखी खरेदी करतात. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर यंदा राखी विक्री व्यवसाय ठप्प झाला असून यंदा दुकाने देखील थाटण्यात आली नाहीत, असे कापडगंज भागातील राखी विक्रेते संजय कोळी आणि गोविंद दायमा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
रविवार पेठेतील कापडगंज भाग प्रतिबंधित क्षेत्रात येतो. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांनी यंदा दुकाने थाटली नाहीत. दरवर्षी राखी खरेदीसाठी या भागात गर्दी होते. दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी सम-विषम दिनांक योजनेमुळे या भागातील निम्म्याहून अधिक दुकाने बंद असतात. खरेदीसाठी गर्दी होत नाही.
भांडवल सुटले तरी पुरेसे
राखी पौर्णिमा आठवडय़ावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या वर्षी भांडवलाएवढे पैसे मिळले तरी पुरेसे आहे. पुढील आठवडाभरात जेवढा होईल तेवढा व्यवसाय करायचा. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे राखी विक्रेते संजय कोळी, गोिवद दायमा यांनी सांगितले.
कोलकाता,अहमदाबाद,मुंबई, दिल्ली बाजारपेठेत निरूत्साह
राखीची सर्वात मोठी बाजारपेठ कोलाकातातील बडा बाजार भागात आहे. वर्षभर तेथे राखी उत्पादन सुरू असते. कोलकातानंतर अहमदाबाद, दिल्ली तसेच मुंबईतील बाजारपेठ मोठी आहे. पुण्यातील बहुतांश व्यापारी कोलाकाता येथून राखी मागवितात. यंदाच्या वर्षी देशातील चार प्रमुख बाजारपेठांत निरू त्साह आहे. दरवर्षीच्या तुलनेत राखीला मागणीही कमी आहे. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी काही व्यापाऱ्यांनी बाहेरगावाहून राख्या मागविल्या होत्या. टाळेबंदीमुळे पुण्याहून पश्चिम महाराष्ट्रात राख्या पाठविण्यात आल्या नाहीत. तेथील खरेदीदार फिरकले नाही.