राखी हे भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतीक मानले जाते. मात्र त्याचबरोबर या राखीचा उपयोग सासर आणि माहेरचे नाते अधिक दृढ करण्यासाठीही केला जातो. राजस्थान आणि गुजरातमधील काही समाजांत हे नाते अधिक दृढ करण्यासाठी वहिनीला राखी बांधण्याची प्रथा रूढ आहे. मुंबई, ठाण्यातील गुजराथी आणि मारवाडी समाजात रूढ असलेली ही परंपरा लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीकडे लक्ष ठेवून असणाऱ्या व्यापाऱ्यांनी वहिनीसाठी वेगळ्या राख्या बाजारात आणल्या आहेत. नणंदेने आपल्या भावजयीला राखी बांधण्याची ही अनोखी प्रथा आहे मुळची राजस्थानची असली तरी पंजाब आणि महाराष्ट्रातील काही भागांत ती बाळसे धरू लागली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ भावालाच राखी न बांधता भावाच्या पत्नीलाही राखी बांधून नणंद आणि वहिनी यांच्यातील नाते राजस्थानी समाजात जपले जाते. भावाला बांधणाऱ्या धाग्याला जसे राखी म्हटले जाते, त्याचप्रमाणे आपल्या वहिनीला रक्षाबंधनाच्या दिवशी बांधल्या जाणाऱ्या धाग्याला लुंबा असे म्हणतात. राजस्थान येथे पूर्वीपासूनच एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे.
अशा कुटुंबात एखाद्या मुलाचे लग्न होऊन परक्या घरातून मुलगी आल्यावर सासर हेच तिचे माहेर आहे ही भावना तिच्यात रुजण्यासाठी नणंदेकडून आपल्या वहिनीला लुंबा राखी बांधली जाते. राजस्थानी भाषेत लुंबा याचा अर्थ लटकलेले असा सांगितला जातो. राजस्थानी आणि गुजराती स्त्रिया आपल्या हातातील बांगडय़ांमध्ये ही लुंबा राखी बांधतात. अर्थाप्रमाणेच ही राखी एखाद्या नाजूक झुंबराप्रमाणे तयार करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या बांगडय़ांना गोंडय़ाचा रेशमी धागा बांधला जायचा. मात्र कालांतराने आधुनिक जीवनशैलीनुसार त्यात बदल होऊन रंगीबेरंगी रंगांत या राख्या तयार होऊ लागल्या.
ठाण्यातील बाजारपेठांमध्ये पारंपरिक राख्यांबरोबरच लुंबा राख्या बाजारात दिसत आहेत. भावाला घ्यायच्या राखीच्या पाकिटात वहिनीसाठी असणाऱ्या या राख्या उपलब्ध आहेत. ७० ते २५० रुपयांपर्यंत असलेल्या या राख्या दिसायला आकर्षक असल्याने अनेक मराठी महिलाही या राखीची खरेदी करतात असे ठाण्यातील राखी विक्रेते रमेश प्रसाद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा