काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात पनून कश्मिर संस्थेच्या वतीने रविवारी शहरातून रॅली काढण्यात आली. तिरंगा व भगवे झेंडे हातात घेऊन युवकांनी ‘कश्मिर है हिंदूुस्थान का, नदी किसिके बाप का’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या.
चोवीस वर्षांपूर्वी सुमारे साडेसहा लाख काश्मिरी पंडितांवर अत्याचार करून त्यांना काश्मीरमधून बाहेर काढले. या दिवसाच्या स्मरणार्थ ‘विस्थापित दिन’ पाळला जातो. त्याचे निमित्त साधून पनून कश्मिर संस्थेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पूल ते बीएमसीसी महाविद्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. शहरातील विविध संस्था व संघटनांमधील युवक मोठय़ा संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला यूथ फॉर पनून कश्मिर संस्थेचे प्रमुख राहुल कौल यांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली. हिंदूू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट त्याचप्रमाणे संदीप खर्डेकर, विजय वरुडकर, रणजित नातू, रोहित भट, अनुप भट आदींनी रॅलीत सहभाग घेतला.
रॅलीच्या समारोपप्रसंगी सभाही घेण्यात आली. काश्मिरी हिंदूूंवर झालेल्या अत्याचारावर आधारित माहितीपटही या वेळी दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे पनून कश्मिर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कश्मिरी पंडितांवर आधारित पथनाटय़ही सादर केले.

Story img Loader