‘संस्कृत भारती’ संस्थेतर्फे संस्कृत भाषेला घराघरात पोहोचविण्यासाठी रविवारी (२३ ऑगस्ट) ‘गृहं गृहं संस्कृतं’ हे अनोखे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत संघटनेचे कार्यकर्ते दिवसभरात किमान दहा हजार घरांमध्ये जाऊन संस्कृतचा प्रचार करणार आहेत.
गेल्या काही वर्षांत संस्कृत भाषा व्यवहारातून लोप पावली असून ती केवळ शिक्षणापुरतीच मर्यादित राहिली आहे. सध्याच्या काळात संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संस्कृत भारती प्रयत्नशील आहे. त्यासाठीच ‘गृहं गृहं संस्कृतं’ हे देशव्यापी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना संस्कतृ भाषेचे महत्त्व, संस्कृत शिकण्याच्या सोप्या पद्धती आणि या भाषेबद्दलचे समज-गैरसमज याबाबत माहिती देणार आहेत. तसेच जनसामान्यांशी संवाद साधून त्यांना संस्कृत भाषेच्या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. संस्कृत ही क्लिष्ट भाषा नसून आपल्या दैनंदिन व्यवहारातही ती सहजपणे वापरता येऊ शकते हा आत्मविश्वास देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे मुक्ता मराठे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील व्यक्तींना संस्कृत शिकण्याची उत्सुकता आणि इच्छा असते. परंतु, काही कारणाने हे शक्य झालेले नाही अशा व्यक्तींसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने संस्कृत संभाषणाच्या पुस्तकांची विक्री, पत्रद्वारा संस्कृत अभ्यासक्रम असे उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा