पुरालेखागारांमध्ये धूळ खात पडलेले ऐतिहासिक मोडी दस्तऐवज वाचण्यासाठी मोडीच्या जाणकारांची नवी फळी तयार करण्याचा संकल्प पुण्यातील काही जुन्या ‘मोडी’ मित्रांनी सोडला आहे. या संकल्पाला बळ देण्यासाठी मोडीचे शहरातील तज्ज्ञ आणि ही लिपी नव्याने शिकू इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी सोमवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ तारखेला सकाळी १० ते ११.३० या वेळात एस. एम. जोशी सभागृहात हा मेळावा होईल. या मेळाव्याचे आयोजक व ‘नाईस डिजिटल अॅकॅडमी’ या संस्थेचे प्रमुख वसंत भट यांनी ही माहिती दिली. भट म्हणाले, ‘‘राज्यात सध्या मोडीचे जवळपास २५ तज्ज्ञ आहेत. मोडीत तयार झालेले काही लोक एकेकटे मोडी शिकवण्याचे काम करतात. त्यांना एकत्र आणून मोठय़ा प्रमाणावर मोडी परिचय वर्ग सुरू करण्याचा आमचा विचार आहे. पुरालेखागारांमध्ये मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांचे अनेक रुमाल बंदिस्त पडलेले आहेत. ही कागदपत्रे वाचून त्यांचे लिप्यंतर करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोडी वाचू शकणारे तज्ज्ञ तयार करणे हा या प्रशिक्षण वर्गाचा उद्देश असेल. या वर्गामध्ये मोडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने दाखवली असून त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना टिमवीचे प्रमाणपत्र मिळू शकेल. सोमवारी होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने मोडीचे किती जाणकार पुण्यात उपलब्ध आहेत आणि इतिहासाच्या किती विद्यार्थ्यांना जुने दस्तऐवज वाचण्यासाठी मोडी शिकण्याची उत्सुकता आहे याचे चित्र या मेळाव्यात समोर येईल.’’
पुण्यात या प्रशिक्षण वर्गाना मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे इतिहासाची केंद्रे, तसेच पुरालेखागारे (अर्काइव्हज्) असलेल्या कोल्हापूर, सातारा, धुळे अशा ठिकाणीही असे वर्ग सुरू करता येतील, असेही ते म्हणाले.
मोडी प्रशिक्षण वर्गाविषयी भट म्हणाले, ‘‘मोडी प्रशिक्षणाचे परिचय, प्रवेश, प्रथमा, प्रवीण आणि पारंगत असे पाच टप्पे आखण्यात आले आहेत. यातील परिचय या वर्गात विद्यार्थी मोडीचे कित्ते गिरवतील, तसेच संगणकावर मोडीचा परिचय करून घेण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांला दिले जाईल. मोडी अक्षरांमध्ये असलेल्या साधम्र्यामुळे जुनी कागदपत्रे वाचताना कोणत्या अडचणी येऊ शकतील याची ओळख त्यांना करून दिली जाईल. या प्रशिक्षणातील ‘पारंगत’ हा शेवटचा टप्पा तीन महिन्यांचा असणार आहे. परिचय ते पारंगत याच्या मधल्या टप्प्यांमध्ये काही विद्यार्थी गळण्याचीही शक्यता आहे. मात्र जे शेवटपर्यंत जातील ते मोडीत प्रावीण्य मिळवू शकतील.’’
‘अगदी १९५७ पर्यंत शाळेत तिसरी- चौथीपर्यंत मोडी शिकवली जात असे. अशा प्रकारे कधीतरी मोडी शिकलेले आणि थोडय़ाशा उजळणीची आवश्यकता असलेले ज्येष्ठ नागरिकही या वर्गात सहभागी होऊ शकतील,’ असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा