पुणे : आकर्षक फुलांनी सजलेली आणि विद्युत रोषणाईने उजळलेली राम मंदिरे… सुवासिक अष्टगंध आणि सर्वत्र दरवळणारा सुगंध… कडक उन्हाची तमा न बाळगता कीर्तन आणि ‘गीतरामायणा’चे सूर कानात साठवत दर्शनासाठी रांगेत असलेले भाविक… सर्वत्र होत असलेला ‘जय श्रीराम’चा जयघोष अशा उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने रामनवमी रविवारी साजरी करण्यात आली.पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. मुख्य पूजेनंतर दर्शन वझे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यापूर्वी रामेश्वर चौकातील रामेश्वर मंदिरापासून रामाच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली.

ठीक १२ वाजून ४० मिनिटांनी सुवासिनींनी समूह स्वरांमध्ये पाळणा म्हटल्यानंतर रामजन्म सोहळा झाला त्यावेळी ‘जय श्रीराम’ आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ घोषणांचा निनाद झाला. रामाच्या पागोट्याचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने यांनी दर्शन घेतले. श्री रामजी संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले या वेळी उपस्थित होते. सायंकाळी रामाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.

शनिवार पेठेतील जोशी श्रीराम मंदिरामध्ये पूजा देशमुख यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. कोथरूड येथील मोडक राममंदिरात रेशीम खेडकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. मोडक परिवारातील केशव मोडक, रेवती मोडक, अमित मोडक, अमेय मोडक या वेळी उपस्थित होते. पुणे विद्यार्थी गृह येथील धनुर्धारी राम मंदिर, तपकीर गल्ली येथील हरभरे राम मंदिर, सदाशिव पेठ येथील रहाळकर राम मंदिर, सदावर्ते राम मंदिर, नारायण पेठेतील भाजीराम मंदिर, रविवार पेठ येथील माहेश्वरी समाजाचे श्रीराम मंदिर, सोमवार पेठेतील श्री काळाराम मंदिर, लष्कर भागातील नामदेव शिंपी समाजाचे श्रीराम मंदिर यांसह शहरातील विविध राम मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली.

पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्टतर्फे फडके हौद चौकाजवळील चव्हाण श्रीराम मंदिर येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा, भारतीय खो-खो संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर, उपकर्णधार सुयश गरगटे, खेळाडू आदित्य गणपुले भारतीय खो-खो पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले आणि महिला संघाच्या प्रशिक्षिक प्राची वाईकर यांना ‘श्रीराम सन्मान’ने गौरविण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चव्हाण, बापू गायकवाड, दत्ता सागरे, डॉ. नितीन भालेराव, मारुतराव देशमुख, आप्पासाहेब गायकवाड, भोला वांजळे या वेळी उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. डॉ. गोऱ्हे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. सुदर्शना त्रिगुणाईत, कांता पांढरे, धनंजय जाधव, अक्षता धुमाळ, बाळासाहेब मालुसरे, नितीन पवार या वेळी उपस्थित होते.

शिरूर येथील श्रीराम मंदिरात समस्त नामदेव शिंपी समाजातर्फे सदाशिव महाराज तोगे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, समस्त नामदेव शिंपी समाजाचे विवेक बगाडे, सिद्धेश्वर बगाडे, राजू बोत्रे, नाना पाटेकर या वेळी उपस्थित होते.