‘‘काही नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊ लागले आहेत. जातीयवादी नेत्यांनी यशवंतरावांचे विचारही लक्षात घ्यावेत. त्यांनी केवळ देखावा करू नये,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा नामोल्लेख न करता केली. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर यशवंतरावांच्या मानसपुत्रावरच ते गरळ ओकतात, असेही ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या कार्यावर राम प्रधान यांनी लिहिलेल्या ‘वादळ माथा ते १९६५ भारत-पाक युद्ध’ या पुस्तकाचे तसेच ‘यशवंतराव चव्हाण एक जीवनप्रवाह’ या छायाचित्र संग्रहाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी तो बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महापौर वैशाली बनकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, कोशाध्यक्ष शांतिलाल सुरतवाला आदी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्शभूमीवर अजित पवार यांनी मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्व जाती-धर्माकरिता व विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले. तसे निर्णय आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडून झालेले नाहीत.
पुस्तकाबाबत ते म्हणाले, यशवंतरावांचा कणखरपणा, हळवेपणा प्रधान यांनी पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. तरुण पिढीने यशवंतरावांसारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पूर्वी प्रत्यक्षात युद्ध लढले जायचे, मात्र सध्या दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध लढले जाते. राष्ट्रापेक्षा धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगून तरुणांची माथी भडकविण्याचे काम केले जाते. या द्वेशाचा राजकीय लाभही काही जण घेतात.
गोखले म्हणाले, चीनशी झालेल्या युद्धात पराभवानंतर सैन्याच्या खचलेल्या मनोबलात यशवंतरावांनी वृद्धी केली. राजकारण, शासन व लष्कर यांचा समन्वय त्यांनी घडवून आणला. अशा समन्वयाचा पायंडा या थोर नेत्याने पाडला. प्रधान यांचे पुस्तक सैन्याच्या इतिहासाच्या अभ्यासकांबरोबरच पुढच्या पिढय़ांना मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रधान यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा सांगितली. यशवंतरावांच्या रोजनिशीतून अनेक गोष्टी मिळाल्या. त्याचप्रमाणे छायाचित्रांच्या संग्रहाच्या पुस्तकासाठी अनेक मित्रांची मदत झाली. त्यातून विविध दुर्मिळ छायाचित्रे मिळाली, असे ते म्हणाले.
यशवंतरावांच्या समाधीच्या दर्शनाचा जातीयवाद्यांचा देखावा – अजित पवार
‘‘काही नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊ लागले आहेत. जातीयवादी नेत्यांनी यशवंतरावांचे विचारही लक्षात घ्यावेत. त्यांनी केवळ देखावा करू नये,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार केली.

First published on: 09-06-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram pradhan new book on yashwantrao chavan released by ajit pawar