रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू, सोनी-महिवाल अशा वेगवेगळ्या प्रेमकथा आहेत. अस्सल मराठी मातीतील ‘रमा-माधव’ ही महाराष्ट्राची प्रेमकहाणी आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘रमा-माधव’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.
कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात राजेश दामले यांनी ‘रमा-माधव’ चित्रपटातील मृणाल कुलकर्णी, रवींद्र मंकणी, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, गौरी कार्लेकर, पाश्र्वगायिका मधुरा दातार आणि संगीत संयोजक नरेंद्र भिडे या कलाकारांशी संवाद साधला.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, पेशवाईबद्दल लेखन विपुल आहे. पण, पेशवाईतील स्त्रियांबद्दलचे लेखन तुलनेने कमी आहे. माधवराव पेशवे यांची पत्नी रमा हिच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे. ही अव्यक्त रमा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. रमाच्या शनिवारवाडय़ातील प्रवेशाने चित्रपट सुरू होतो. एका अर्थाने हा चित्रपट ‘स्वामी’ मालिकेपूर्वीचा आहे. परदेशामध्ये हा चित्रपट केला असता, तर रमाबाईचे सती जाण्याचे दृश्य दाखविले असते. कोणाच्या भावना  दुखावू नयेत म्हणून हा प्रसंग वेगळ्या पद्धतीने चित्रित केला आहे.
रवींद्र मंकणी म्हणाले, नानासाहेब पेशवे ही भूमिका कमी लांबीची असली, तरी ती आव्हानात्मक असल्याने स्वीकारली. मृणालबरोबर पूर्वी माधवराव व्यक्तिरेखा साकारली आहे. आता या प्रकल्पामध्ये खारीचा वाटा उचलावा ही देखील त्या मागची भूमिका आहे.
आलोक राजवाडे म्हणाला, सामान्य माणूस त्याचेच एक आयुष्य जगतो. कलाकार म्हणून मला एकाहून अधिक आयुष्य जगण्याची संधी मिळते. हा चित्रपट करण्यापूर्वी ‘स्वामी’ कादंबरी वाचली.
पर्ण पेठे म्हणाली, या भूमिकेच्या निमित्ताने पेशवाईच्या काळात जाण्याची संधी लाभली आणि ‘रमा’ या व्यक्तिरेखेचे विविध कंगोरे उलगडता आले. भूमिकेचा दबाव असण्यापेक्षाही हे गोड आव्हान होते.
नरेंद्र भिडे म्हणाले, आनंद मोडक यांच्या आकस्मिक निधनानंतर पाश्र्वसंगीताची संपूर्ण जबाबादारी येऊन पडली. संगीत त्या वेळचे वाटले पाहिजे आणि आजच्या युवकांनाही ते आवडले पाहिजे असे दुहेरी आव्हान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा