कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शौर्यदिनाचे यंदाचे २०५ वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये येथे दाखल झाले आहेत. त्याच दरम्यान आरपीआय (A) गटाचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- ….म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भीमा कोरेगावला जाणे टाळले!
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, यंदाच्या २०५ व्या शौर्यादिन राज्याच्या अनेक भागातून लाखोच्या संख्येने नागरिक अभिवादन करण्यासाठी येथे आलेले आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो. तर मी केंद्र, राज्य सरकार, तसेच समाजाच्यावतीने अभिवादन करायला आलो आहे. त्याचबरोबर स्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जागेची गरज आहे. त्यानंतर स्मारक उभा राहणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे स्मारकाचा प्रश्न मार्गी लवकरात लवकर मार्गी लागावा. यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा नेत्यांकडून अनेक वेळा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केली जात आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत मी शांत नाही आणि मी गप्प बसणारा देखील नाही. मी यावर वेळोवेळी माझी भूमिका मांडली असून चंद्रकांत पाटील यांनी त्या प्रकरणी माफी देखील मागितली असल्याच सांगत एकूणच या प्रकरणी रामदास आठवले यांनी अधिक बोलणे टाळले.