पुणे : राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम १५०० रुपयांहून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे, अशी मागणी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.
‘गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकारचा विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून महसूल कमी मिळत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनाच कारणीभूत नाही. या योजनेमुळे राज्याच्या तिरोजीरवर फार मोठा बोजा पडणार नाही. दावोस येथे विविध उद्योगांशी झालेल्या करारानुसार राज्यात १५ लाख ९० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही उपाययोजना करून मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळ राज्याच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले पाहिजे.’ असे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, माची शहयाध्यक्ष महेंद्र कांबळे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड आदी उपस्थित होते.
‘माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री फडणवीस बदलत आहेत, स्थगिती देत आहेत, अशी चर्चा होत आहे. ती फक्त चर्चा आहे. हे निर्णय एकनाथ शिंदे यांचे नसून महायुती सरकारचे होते. फक्त एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थागती नसून, सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती असणार आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. राज्याच्या मंत्रिमंडळात भारतीय रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते, मात्र ते मिळाले नसून भविष्यात तरी एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही नाराज आहोत, असे आठवले म्हणाले.
आंबेडकर स्मारक उभारावे
पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्यामागे दोन एकरचा भूखंड आहे. या जागेवर कर्करोग उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठीचा प्रस्ताव आहे. मात्र, या जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जावे. रुग्णालयाला विरोध नसून त्यासाठी दुसऱ्या जागेची पाहणी करावी. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.