दलितांची मते पारडय़ात टाकून भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आणण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिपणे पार पाडली आहे. आता या दोन्ही सरकारमध्ये आमच्या पक्षाला सत्तेमध्ये स्थान देण्याची जबाबदारी भाजपने पूर्ण करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी केली. पत्नी सीमा यांच्या मंत्रिपदासंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे सांगत ‘मला पक्ष चालवायचाय आणि तिला घर चालवायचेय’, अशी टिप्पणी त्यांनी केली.
आठवले जेथे जातात त्या पक्षाला सत्ता मिळते असे मुख्यमंत्री वारंवार म्हणतात खरे. पण, हा सत्तेतील वाटा काही मिळत नाही. दोनच दिवसांत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असून या वेळी मंत्रिपद मिळेल, असे सांगून आठवले म्हणाले, सध्या सत्तेमध्ये भाजप ७० टक्के आणि शिवसेना ३० टक्के असे वाटप झाले आहे. पण, महायुतीतील अन्य पक्षांना १० टक्के वाटा ठरला आहे. त्यापैकी पाच टक्के वाटा आमच्या पक्षाचा असला पाहिजे. महामंडळांमध्येही उचित स्थान मिळायला हवे ही आमची मागणी आहे.
बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीवर्षांत इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केले. लंडन येथील बाबासाहेबांच्या घराचे स्मारक करण्यात आले आहे. महू येथील स्मारकाच्या विकासाचे काम सुरू आहे. ही प्रलंबित कामे मार्गी लावल्यामुळे दलित समाज नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबाबत समाधानी असल्याचे आठवले यांनी सांगितले. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर मोदी यांच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लंडन येथे झालेल्या मोदींच्या सभेस ७० हजार नागरिक उपस्थित होते, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्यासंबंधी भाष्य केले होते. मात्र, मोदी यांनी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाची मते वेगळी असली तरी सत्तेमध्ये आल्यानंतर घटनेनुसारच काम करावे लागते, असेही आठवले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा