अन्य पर्याय उपलब्ध असल्याचा सूचक इशारा
भारतीय जनता पक्षावर शिवसेनेकडून साडेचार वर्षे सातत्याने टीका करण्यात आली. मात्र त्यानंतरही युतीमधील जागा वाटपात शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भाजपला प्रामाणिक साथ देऊनही जागा वाटपात पक्षाचा विचार झाला नाही, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले युतीमध्ये डावलल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजपने मन मोठे करून एक जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी करताना, अपमान होत असेल तर आम्हाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत, असा सूचक इशाराही आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
आठवले म्हणाले, की निवडणुकीसाठी युती झाली ही समाधानाची गोष्ट आहे. पण युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला बाजूला करण्यात आले. युतीच्या चर्चेत आठवले यांना बोलविले नाही तरी चालेल, जागा सोडली नाही तरी चालेल, आठवले आपल्या मागे येतील, असे कदाचित त्यांना वाटत असावे. मला किंवा माझ्या पक्षाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तरी मी बाजूला राहणार नाही. माझ्याशी कोणी वाकडे वागल्यास मी पण त्याला जशास तसे उत्तर देईन. युतीमध्ये एक जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे.
युतीच्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतरही मागण्यांचा विचार झाला नाही तर पक्षाच्या उच्चस्तरीय बैठीकत पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या निवासस्थानी लवकरच मित्र पक्षांची बैठक होणार आहे. शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईची किंवा भाजपने ईशान्य मुंबईतील एक जागा लोकसभा निवडणुकीसाठी द्यावी तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सात ते आठ जागा द्याव्यात, असे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचा येत्या २२ मार्च रोजी पिंपरी येथे मेळावा होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
‘शरद पवारांनी भेटीसाठी बोलविले आहे’
युतीमध्ये डावलल्याची भावना बोलून दाखविताना रामदास आठवले म्हणाले, की सत्तेमध्ये असूनही आम्हाला योग्य वाटा मिळाला नाही. त्याबाबत तक्रार केली नाही. आम्ही त्याग केला आहे. आता भाजप-शिवसेनेने त्याग करायला हवा. अपमान होत असेल तर आम्हाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला भेटायला बोलाविले आहे.