राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असून माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.
“राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे, ते योग्य नाही. परंतु, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” असं आठवले म्हणाले. रामदास आठवले हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
यावेळी आठवले म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जागा आम्हाला ३९ द्या आणि बाकीच्या तुम्ही घ्या. किती घ्यायचे ते पाहू पण एवढ्या नकोत. ज्या-ज्या ठिकाणी आमचे चांगले कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी आम्हाला तिकीट द्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणायची आहे. भाजपाचा महापौर झाला तर आमचा उपमहापौर झाला पाहिजे. पुण्यात आमचा उपमहापौर आहे,” रामदास आठवलेंनी असं म्हणताच हशा पिकला.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”